नागपुरात धक्कादायक घटना:कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आयआयआयटीतील विद्यार्थ्याचा मृत्यू, परीक्षेच्या तणावाचा परिणाम

0
730-x-548-new-2026-05-05t100005239_1777955502.jpg




नागपूरमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र हादरून गेले आहे. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’मध्ये शिकणाऱ्या एका द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. श्रेयस माने असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी होता. या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक तणाव आणि शैक्षणिक दबावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस हा कॉम्प्युटर सायन्स शाखेत द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या चौथ्या सत्राच्या परीक्षा सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी ही घटना घडली. पहाटेच्या सुमारास त्याने वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थी आणि प्रशासन हादरून गेले आहे. या प्रकरणात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. मात्र, घटनेपूर्वी तो गंभीर मानसिक तणावाखाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्या मित्रांच्या मते, श्रेयसचे काही विषय प्रलंबित होते आणि त्याचा परिणाम म्हणून तो दबावाखाली होता. त्यामुळे परीक्षेची भीती आणि शैक्षणिक ताण यामुळे त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर आयआयआयटी नागपूरच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात रात्रभर आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी संस्थेच्या धोरणांवर आणि अभ्यासाच्या वाढत्या दडपणावर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, मानसिक आरोग्याबाबत पुरेशी मदत उपलब्ध नसल्याने अशा घटना घडत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. अधिकृतरीत्या संस्थेकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेनंतर शैक्षणिक संस्थांमधील मानसिक आरोग्याच्या सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण व्यवस्थेला जागं करणारा इशारा या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण, अपेक्षा आणि स्पर्धेचा वाढता दबाव यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि भावनिक आधार देणे अत्यंत गरजेचे आहे. ही घटना केवळ एक अपघात नसून, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला जागं करणारा इशारा असल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed