माजी राष्ट्रपती कोविंद, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या धर्मध्वजारोहण:महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, उद्योगमंत्री उदय सामंत आणि स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचीही उपस्थिती
![]()
श्री काळाराम मंदिर येथे धर्म ध्वजारोहणासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (दि.6) नाशिकला येणार आहेत. काळारामाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या हस्ते गोदावरीची महाआरती होईल. दरम्यान, तत्पूर्वी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि विविध बैठकांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरला दर्शनपथाचे भूमिपूजन सिंहस्थाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनपथाची उभारणी केली जाणार आहे. या दर्शनपथाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या रिंगरोडचेही भूमिपूजन होऊ शकते. परंतु, सध्या शेतकऱ्यांचा या रिंगरोडच्या अलाईनमेंटला मुंगसारे, मातोरीसह 4-5 गावांत विरोध असल्याने रिंगरोडच्या भूमिपूजनाबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. कुंभ उद्योग संगम आणि इन्व्हेस्टमेंट समिट कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायाला चालना देण्यासाठी एका तारांकित हॉटेलमध्ये बुधवारी (दि. 6) सकाळी 9.3० ते दुपारी 3.3० या वेळेत ‘कुंभ उद्योग संगम’ आणि ‘नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट’ होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यात 15,००० कोटींच्या गुंतवणुकीसह विविध संस्था व कंपन्यांसोबत एमओयू (सामंजस्य करार) देखील होणार आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत आणि उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांचीदेखील उपस्थिती असेल. काळाराम मंदिर धर्मध्वजारोहण सोहळा सायं. 6 वा. श्री काळाराम मंदिर धर्मध्वजारोहण व ‘कथा तथागत की’ सांगता समारोपानिमित्त बुधवारी (दि. 6) गोदा महाआरती होणार आहे. दुतोंड्या मारुती मंदिर येथे सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर उपस्थित राहणार आहेत. बुधवारच्या बाजाराला सुट्टी गोदावरीच्या महाआरतीच्या निमित्ताने मान्यवरांची उपस्थिती असेल. यामुळे सुरक्षा आणि पार्किंगच्या दृष्टीने गोदाकाठी भरणाऱ्या बुधवारच्या बाजाराला सुट्टी देण्यात आली आहे. काळाराम मंदिर धर्मध्वजारोहण सोहळ्यानिमित्त सोमवारी (दि. 4) कळसाजवळ क्रेनच्या सहाय्याने ध्वजदंडाच्या गर्त (खड्डा) भागात नवरत्ने स्थापन करून पूजन करण्यात आले. यावेळी महंत सुधीर पुजारी यांनी विश्वस्त ॲड. अक्षय कलंत्री आणि विश्वस्त प्रतीक पुजारी यांना संकल्प सांगून विधिवत पूजन केले.
