शासनाचा तरुणांच्या आयुष्याशी खेळ!:पोलिस भरतीच्या पेपर प्रकरणावरून रोहिणी खडसेंची टीका; कामचुकारपणा की तोडपाणी?- रोहित पवार
![]()
महाराष्ट्र पोलिस भरती अंतर्गत SRPF गट 5, दौंड येथील लेखी परीक्षेचा पेपर नुकताच पार पडला. मात्र, या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेले प्रश्न हे एका खासगी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील असल्याचे समोर आले आहे. 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत विचारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया देत शासनावर टीका केली आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या, आपल्या राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी शासन कसा खेळ करत आहे पहा. महाराष्ट्र पोलिस भरती अंतर्गत SRPF गट 5, दौंड येथील लेखी परीक्षेचा पेपर नुकताच पार पडला. मात्र, या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेले प्रश्न हे कुठल्याही अधिकाऱ्यांनी तयार केलेले नव्हते. या संपूर्ण प्रश्नपत्रिकेत एका खासगी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील प्रश्न होते. 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे उचलण्यात आले होते. म्हणजे 85 टक्के प्रश्न याच पुस्तकातून आले होते. पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या, पोलिस दलासारख्या महत्त्वाच्या विभागात भरती प्रक्रियेसाठी स्वतः तज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नसंच काढणे अपेक्षित असताना, एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातील प्रश्न उचलले जात असतील तर यातून प्रशासनाचा हलगर्जीपणा तर समोर येतोच, पण पारदर्शकतेवरही प्रश्न निर्माण होतोय. यात नक्कीच एखादा अधिकारी या खासगी प्रकाशनाशी संबंधित असेल. त्यामुळे याची तातडीने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली आहे. तसेच 3977 मुलांनी ही परीक्षा दिली आहे. अहोरात्र मेहनत करणाऱ्या गरीब आणि होतकरू मुलांच्या स्वप्नांवर कोण नांगर फिरवत असेल तर त्याच्या मुसक्या आवळल्या पाहजे, असेही खडसे म्हणाल्या. कामचुकारपणा की तोडपाणी?- रोहित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलाच्या भरतीत एका खाजगी प्रकाशकाच्या प्रश्नसंचातील 85 प्रश्न जसेच्या तसे घेणे म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ञाचा कामचुकारपणा आहे की तोडपाणी? असा थेट सवाल पवारांनी उपस्थित केला. पुढे रोहित पवार म्हणाले, गोरगरीब कष्टकरी विद्यार्थी जिवाचे रान करून अहोरात्र मेहनत करतात आणि अशाप्रकारे त्यांच्या स्वप्नांशी, त्यांच्या भविष्याशी खेळणे योग्य आहे का? यापूर्वी तलाठी भरतीसह अनेक भरती परीक्षेतही अशाच प्रकारे खेळ झाला होता आणि आजही तसाच खेळ होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून सरकारने तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
