पंढरपुरात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात राडा:किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण, कार्यक्रम अर्ध्यावर थांबवण्याची वेळ; VIDEO
![]()
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे यल्लमादेवी यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमात मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. डान्स पाहताना तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. धक्काबुकी, आरडाओरडा आणि शिवराळ भाषेमुळे कार्यक्रमात प्रचंड गोंधळ निर्माण झाला, परिणामी कार्यक्रम अर्धवट थांबवण्याची वेळ आयोजकांवर आली. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच सुस्ते गावात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळेस प्रचंड गर्दी होऊनही कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता आणि कार्यक्रम शांततेत पार पडला होता. मात्र, त्यानंतर दोनच दिवसांत राधा पाटील यांच्या कार्यक्रमात परिस्थिती हाताबाहेर गेली. राधा पाटील यांचा डान्स सुरू असताना शेवटच्या टप्प्यात काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली आणि किरकोळ कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. घटनेनंतर सुस्ते गावात तणावपूर्ण शांतता पसरली असून, नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यात गोंधळाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहेत. पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज राडा वाढल्याचे पाहून उपस्थित पोलिसांनी तात्काळ हालचाल करत परिस्थिती नियंत्रणात आणली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला आणि पुढील अनर्थ टाळण्यासाठी राधा पाटील यांचा कार्यक्रम थांबवण्याचे आदेश दिले. राजकीय स्पर्धा आणि कार्यक्रमाची चढाओढ सुस्ते गावात दोन राजकीय गट असून, एका गटाने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता, तर दुसऱ्या गटाने राधा पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या हाणामारीमागे कोणताही प्रत्यक्ष राजकीय हेतू नसला तरी, गावात दोन कार्यक्रम लागोपाठ आयोजित केल्याने आधीच तणावाचे वातावरण होते. मंगळवारी झालेल्या राड्यामुळे अखेर यात्रेच्या आनंदावर विरजण पडले. या घटनेमुळे यात्रांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आयोजकांनी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कोण आहे राधा पाटील? राधा पाटील ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध लावणी नृत्यांगना आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. राधा पाटील मुळची मुंबईची असून, आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ती राधा पाटील मुंबईकर नाव लावते. मागील काही दिवसांपासून राधा पाटील ही गौतमी पाटीलला टक्कर देणारी कलाकार म्हणून चर्चेत आली आहे. २०२६ मध्ये बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमधील सहभागामुळे ती आणखीनच प्रसिद्धीच्या झोतात आली. आपल्या डान्स आणि बिनधास्त स्वभावासाठी ती ओळखली जाते.
