मोदींनी ममतांना पराभवाची झालमुडी चाखवली:बंगाली जनतेने खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित केली; शिंदेंनी केले मोदी – शहांचे कौतुक
![]()
सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पश्चिम बंगालमधील विजयाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आहे. आज भाजपसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण, आज पहिल्यांदाच बंगालमध्ये कमळ उमलले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपने ममता बॅनर्जी यांना पराभवाची झालमुडी खाऊ घातली, असे ते म्हणालेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय झाला आहे. भाजपने येथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा मानहानीकारक पराभव केला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, आज भाजपसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच ‘कमळ’ उमलले आहे. देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भाजपने ममता दीदींना पराभवाची ‘झालमुडी’ चाखवली आहे. बंगालमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित एकनाथ शिंदे म्हणाले, गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराला कंटाळून, पश्चिम बंगालच्या जनतेने खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित केली आहे. त्यांनी विकास, प्रगती, स्थिरता आणि शांतता यांच्या बाजूने मतदान केले आहे. हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. या शताब्दी वर्षात, आदरणीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत भाजपचा झालेला विजय हा सर्वार्थाने ऐतिहासिक आहे. गेल्या 10 वर्षांतील अथक प्रयत्नांच्या जोरावर, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ममता दीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. अमित शहा हेच भाजपचे ‘चाणक्य’ आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दडपशाहीच्या सर्व प्रकारांना न जुमानता, प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने अढळ निश्चयाने ही लढाई लढली; म्हणूनच, भाजप कार्यकर्तेही अभिनंदनास पात्र आहेत. या निवडणूक प्रचारात ममता दीदींनी भाजप, मोदीजी आणि अमित भाई यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. जनतेने मतपेटीच्या माध्यमातून या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. आता, पश्चिम बंगालचा सर्वांगीण विकास साध्य करून भाजप सरकार त्या टीकेला यथोचित उत्तर देईल. भाजपच्या नेतृत्वाखाली, पश्चिम बंगालमध्ये आता विकासाच्या एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘डबल इंजिन’ सरकारमुळे, पश्चिम बंगालमधील विकासाची ‘बुलेट ट्रेन’ आता पूर्ण वेगाने सुसाट धावणार हे निश्चित आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
