नवले पुलावरील आंदोलनात पोलिसांचा बळाचा वापर:आयुक्तांचा मात्र लाठीमाराचा इन्कार, चिमुकलीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार

0
db-temp-cover-marathi-2026-05-03t090610782_1777779426.jpg




नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी रात्री पुण्याच्या नवले पुलावर जनआक्रोशाचा उद्रेक झाला. संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी पीडितेचा मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखून धरल्याने सुमारे चार तास वाहतूक ठप्प होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवले आणि रस्ता मोकळा केला. मात्र, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशाप्रकारचा कोणताही लाठीचार्ज झालाच नसल्याचे म्हटले आहे. आम्ही मृत मुलीच्या आई-वडिलांना समजावून येथून बाहेर काढल्याचा दावा अमितेश कुमार यांनी केला. १ मे रोजी नसरापूर येथे ६५ वर्षीय नराधमाने केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आरोपीवर कठोर कारवाईचे ठोस आश्वासन मिळत नसल्याने शनिवारी सायंकाळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. चिमुकलीचा मृतदेह नवले पुलावर आणून नातेवाईकांनी ठिय्या मांडला. “जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत हटणार नाही,” असा निर्धार आंदोलकांनी केल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांचा दावा: “लाठीमार झालाच नाही” या प्रकरणावर बोलताना पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीमाराचा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, “आम्ही पीडितेच्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन त्यांची समजूत काढली. काही लोक त्यांना बाहेर पडू देत नव्हते, त्यांना केवळ बाजूला करण्यात आले. आई-वडील स्वखुशीने गाडीत बसले. पोलिसांनी कोणतेही ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ केलेले नाही. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल, लवकरात लवकर आरोपपत्र दाखल होईल आणि पीडितेच्या कुटुंबाला हवा तो वकील दिला जाईल, असे आश्वासन आम्ही दिले आहे.” आंदोलकांचा संताप: “हे तर इंग्रजांचे सरकार” दुसरीकडे, पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आंदोलक कमालीचे संतापले आहेत. “न्याय मागणाऱ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केला, ही सरकारची दडपशाही आहे. आम्हाला या सरकारची लाज वाटते, हे तर इंग्रजांचे सरकार आहे,” अशा शब्दांत आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला. पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलकांना पांगवण्यात आले आणि रात्री उशिरा महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली. चिमुकलीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार दरम्यान, चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी तो थेट पुण्यातील नवले पुलावर आणून रास्ता रोको केला. “जोपर्यंत या नराधमाला कठोर शिक्षा होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि चिमुकलीवर अंत्यसंस्कारही करणार नाही,” अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. मात्र, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे मृत मुलीच्या आई-वडिलांना समजावून तेथून बाहेर काढल्यावर पीडित चिमुकलीच्या पार्थिवावर शनिवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण परिसरात अद्यापही तणावपूर्ण शांतता असून, नागरिकांकडून आरोपीला भरचौकात फाशी देण्याची मागणी केली जात आहे. आरोपीला ७ मे पर्यंत कोठडी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याला पुणे शिवाजीनगर न्यायालयाने ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू असून भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed