जातीची गोष्ट केली, तर जोरात लाथ घालेन:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विधान; देशात कुणाशाही कोणताही भेदभाव होत नसल्याचा दावा

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-02t12_1777704057.png




केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्ला चढवला आहे. देशात हिंदू व मुस्लिमांना एकाच भावात गॅस, पेट्रोल व डिझेल मिळते. त्यामुळे देशात विकास व सोयी सुविधांच्या बाबतीत कुणाशीही भेदभाव होत नाही. या प्रकरणी कुणी माझ्याकडे जातीचा विषय काढला, तर मी त्याला लाथ घालेन, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी नागपूर येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी आपल्या मिश्किल भाषणाद्वारे त्यांनी जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या नेत्यांवर तिखट शब्दांत निशाणा साधला. नितीन गडकरी म्हणाले, आजकाल अनेक लोक जात आणि धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा प्रकारच्या राजकारणावर माझा विश्वास नाही. जात आधारित राजकारणामुळे राष्ट्राचे कल्याण होऊ शकत नाही. जातीच्या गोष्टी करणाऱ्यांना लाथ घालणार आपल्या नेहमीच्याच स्पष्ट आणि मिश्किल शैलीत नितीन गडकरी म्हणाले, एखाद्या हिंदूला ज्या दरात गॅस, पेट्रोल आणि डिझेल मिळते, अगदी त्याच दरात ते एखाद्या मुस्लिमालाही मिळते. यावरून हे स्पष्ट होते की, विकास आणि सार्वजनिक सोयी सुविधांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव अजिबात केला जात नाही. जातीचा पाढा वाचत बसण्यात काहीच अर्थ नाही. मी असे अनेक नेते पाहिले आहेत, जे सार्वजनिक व्यासपीठांवरून जातीबद्दल बोलतात आणि घोषणा देतात. पण जेव्हा ते खाजगीत भेटतात, तेव्हा मात्र ते आपल्या मुलांसाठी किंवा पत्नीसाठी निवडणुकीचे तिकीट मागत असतात. जनतेने या दांभिक नेत्यांचा खरा चेहरा आता ओळखला आहे. जो कुणी जातीबद्दल बोलेल, त्याला मी एक जोरात लाथ घालेन. भारताची प्रगती यंत्रामुळे नव्हे, तर कामगारांमुळे केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी असेही नमूद केले की, ते आपले विचार नेहमीच मनमोकळेपणाने मांडतात आणि आपल्या तत्त्वांवर ठाम राहतात. नितीन गडकरी म्हणाले, मी जे काही बोलतो, ते पूर्ण आत्मविश्वासाने आणि धैर्याने बोलतो. मी माझ्या शब्दाला जागलो आहे की नाही, यावर कुणीही कधीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रनिर्मिती मागील सर्वात मोठी शक्ती म्हणून कामगारांच्या योगदानावर प्रकाश टाकला. तसेच भारताची प्रगती केवळ यंत्रांमुळे नव्हे, तर लक्षावधी कामगारांच्या कठोर परिश्रमामुळे आणि समर्पणामुळे शक्य झाली, असे ठामपणे सांगितले. नितीन गडकरी म्हणाले, या राष्ट्राची उभारणी लक्षावधी कामगारांच्या रक्त आणि घामावर झाली आहे. देशाच्या विकासात आपल्या कामगारांनी अफाट योगदान दिले आहे. मग ते रस्ते असोत, इमारती असोत, सिंचन प्रकल्प असोत किंवा मोठ्या पायाभूत सुविधांचे उपक्रम असोत. या सर्वांची निर्मिती केवळ यंत्रांद्वारे नव्हे, तर कामगारांच्या कष्टांतूनच झाली आहे. हा कामगार वर्गच देशाच्या विकासाचा खरा कणा आहे आणि तो यथोचित मान – सन्मान व संधी मिळण्यास पात्र आहे. या कामगारांचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील याची खात्री करण्यासाठी सरकार अविरत प्रयत्नशील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed