पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणीचा गळा चिरला:प्रकृती चिंताजनक, खासगी रुग्णालयात उपचार; आरोपीचा शोध सुरू

0
5fe2fdb7-7892-4f7c-b0dd-a684efb2d750_1777621373916.jpg




पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणीचा ब्लेडने गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय 22, रा. चंदननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे जखमी तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी दिलीप राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उजालादेवीचा मोठा भाऊ भगतसिंग (वय 25) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप राठोड आणि उजालादेवी हे नगर रस्त्यावरील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. याच काळात त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. ही घटना चंदननगरमधील पठारे वस्ती भागात घडली. उजालादेवी घरी एकटी असताना आरोपी दिलीप राठोड तिच्या घरात शिरला. तिचा भाऊ भगतसिंग आणि त्याची पत्नी कामावर गेले होते. घरात घुसल्यानंतर आरोपीने उजालादेवीसोबत वाद घातला आणि ब्लेडने तिचा गळा चिरला. गंभीर जखमी अवस्थेत उजालादेवीने तिचा भाऊ भगतसिंग याला फोन करून मदतीसाठी बोलावले. भावाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सोमय मुंडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट दिली. गळा चिरल्याने बोलता येत नसलेल्या तरुणीने कागदावर आरोपीचे नाव लिहून पोलिसांना माहिती दिली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed