बार्शीत नभांगणात अवतरले रंगीबेरंगी नक्षत्र:शोभेच्या तोफांनी उपस्थितांना ठेवले खिळवून, फटाक्याच्या आतिषबाजीने बार्शीकरांच्या डोळ्यांचे फिटले पारणे‎

0
250_177756058669f36c0a449b7_82801525884.jpg




बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताच्या उत्सवानिमित्त आयोजित ‘भगवंत महोत्सवाचा’ समारोप अत्यंत नेत्रदीपक आणि रोमांचक पद्धतीने झाला. बार्शी नगरपरिषद, देवस्थान ट्रस्ट आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शोभेच्या दारूकामाच्या आतिषबाजीने संपूर्ण बार्शी शहर उजळून निघाले. सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील नामवंत फायर वर्क्सनी सादर केलेल्या कलेला बार्शीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. भगवंत मैदानावर हा सोहळा सलग अडीच तास रंगला होता. स्टेडियमची प्रेक्षक गॅलरी प्रेक्षकांनी ओसंडून वाहत होती. शिवशक्ती अर्बन को-ऑप बँक प्रायोजित या कार्यक्रमाची सुरुवात श्री भगवंताच्या प्रतिमा पूजनाने आणि आरतीने झाली. आतिषबाजी सुरू होताच आकाशात विविध रंगांची उधळण झाली. यामध्ये श्री भगवंत नावाचा बोर्ड, महाकाल, २१ तोफा आणि आकाशात झेपावणाऱ्या फॅन्सी तोफांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. यावेळी डॉ. बी. वाय. यादव, डॉ. प्रकाश बुरगुटे, रणवीर राऊत, अरुण बारबोले, जयकुमार शितोळे, श्रीधर कांबळे, अॅड. सुभाष जाधवर, अरुण बळप, महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा यांच्यासह नगरपरिषद, पंचायत समिती व बाजार समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. . अनुभवी हात: बीडचे इस्माईल सय्यद, सोलापूरचे सिद्धेश्वर फायर वर्क्स, माणकेश्वरचे स्टार फायर वर्क्स आणि बार्शीचे स्थानिक कलाकार महेबुब आतार, गनीभाई आतार व शोएब मनियार यांनी आपली कला सादर केली. . विशेष प्रकार: प्रतापगड, किल्ला, तिरंगा झाड, धबधबा, अशोक चक्र, नागराज, कारगिल शॉट आणि सतत २०० नगांची मल्टीकलर आयपीएल तोफ यांसारख्या शेकडो प्रकारांनी नभांगण उजळले. . सेलिब्रिटी शॉट्स: आकाशात उडणाऱ्या फटाक्यांना दिपिका पदुकोण, राखी सावंत अशी रंजक नावे देण्यात आली होती, ज्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. माहिती आणि विनोदाची ‘फटक्यात’ पेरणी या कार्यक्रमाची रंगत निवेदक श्रीधर कांबळे यांनी अधिकच वाढवली. त्यांनी आतिषबाजीचा इतिहास, रंजक किस्से आणि प्रासंगिक विनोद सांगत अडीच तास प्रेक्षकांना माहितीपूर्ण व खुमासदार निवेदनाने जोडून ठेवले. तांत्रिक माहितीसोबतच मनोरंजनाची जोड मिळाल्याने सोहळ्याची उंची अधिकच वाढली. बार्शीच्या सांस्कृतिक वैभवाचा कळस भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून बार्शीच्या सांस्कृतिक परंपरेला एक नवे व्यासपीठ मिळाले आहे. अडीच तास चाललेली ही आतिषबाजी केवळ बार्शीसाठीच नव्हे, तर लगतच्या तीन जिल्ह्यांतून आलेल्या लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. शिस्तबद्ध नियोजन आणि जनसमुदायाचा प्रचंड प्रतिसाद यामुळे हा महोत्सव ऐतिहासिक ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed