तृष्णेपासून मुक्त होण्याकरिता अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा:पंचशीलनगरातील बौद्ध धम्म परिषदेत भदन्त ग्यानरक्षित महाथेरो यांचे प्रतिपादन
![]()
मानवी जीवनातील दुःखाचे प्रमुख कारण तृष्णा म्हणजेच अतोनात इच्छा, आसक्ती आणि लोभ आहे. मनुष्य जितका इच्छांच्या मागे धावतो, तितकाच तो दुःखाच्या गर्तेत अडकत जातो. काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा असे तीन प्रकार आहेत. इंद्रियसुखांची लालसा, सतत काहीतरी मिळवण्याची धडपड आणि नको असलेल्या गोष्टींचा तिरस्कार या सर्व गोष्टी मनात अस्थिरता निर्माण करून दुःख वाढवतात. अशा तृष्णेपासून मुक्त होण्यासाठी अष्टांगिक मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन भदन्त ग्यानरक्षित महाथेरो यांनी केले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने पंचशिल नगरातील बुद्ध विहाराच्या प्रांगणात एक दिवसीय बौद्ध धम्म परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. महाबोधी महिला बहुउद्देशीय संस्था व महाबोधी बुद्ध विहारच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील भदन्त ग्यानरक्षित महाथेरो ऑनलाइन उपस्थित होते. अखिल भारतीय भिक्खू संघाचे मार्गदर्शक भदन्त बुद्धघोष महाथेरो यांनी उद्घाटन केले. प्रमुख अतिथी म्हणून भदन्त निर्मलपुत्त आनंद महाथेरो, भदन्त चंद्रमणी थेरो, भदन्त सुभद्र थेरो, भदन्त आर्य सारीपुत्त थेरो, आर्याजी प्रजापती, आर्याजी धम्मदिपामहाथेरी, आर्याजी धम्मचारिणी महाथेरी, आर्याजी कुंडलकेशा सामनेरी, आर्याजी संघशिला सामनेरी, भिक्खु सिलवंसलंकारा यांच्यासह भिक्खू संघ धम्मपिठावर उपस्थित होता. विशेष अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार आणि नगरसेवक मंगेश मनोहरे उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन नयन मोंढे यांनी केले. आभार संस्थेचे अध्यक्ष संजीवनी मनोहरे यांनी मानले. धम्म परिषदेला यशस्वी करण्याकरिता पंकज डोंगरे, जयकुमार चेंडकापुरे, सुधीर भगत, प्रमोद ढोले, अशोक ढोले, ममता ढोले, अनिता ढोले, आशा सोमकुवर, रूपाली मनोहरे, रेखा मनोहरे, माया वानखडे, दुर्गा वाहने, पार्वता गजभिये, निर्मला चंडकापुरे आदी बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते.
