महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांचा संवाद:एलनिनोचा इशारा; पेरणीची घाई नको, शेतकऱ्यांना खबरदारीची सूचना

0
1facebook-googlechrome2026-05-0110-43-38-ezgifcom-_1777612908.gif




महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी राज्याच्या विकासाचा आढावा घेत पायाभूत सुविधांपासून गुंतवणुकीपर्यंतच्या प्रगतीवरही भाष्य केले. महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितले की, हा दिवस केवळ उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित नसून आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. आपण विकासाच्या प्रवासात कुठे होतो, आज कुठे आहोत आणि पुढे किती अंतर गाठायचं आहे, याचा विचार करण्याचा हा दिवस आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी यंदाचे वर्ष समता आणि सामाजिक समरसतेचे वर्ष म्हणून साजरे होत असल्याचेही सांगितले. जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी आखाती देशांमधील संघर्षामुळे निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख केला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी घेतलेल्या उपाययोजनांमुळे देशातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यायी ऊर्जा स्रोत, सौर ऊर्जा विस्तार आणि इंधन व्यवस्थापनामुळे भारताला जागतिक संकटाचा फटका कमी बसल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या आर्थिक प्रगतीबाबत बोलताना फडणवीस यांनी महाराष्ट्र देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 14 टक्के योगदान देत असल्याचा दावा केला. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याने 1,64,875 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित केली असून हे देशातील एकूण गुंतवणुकीच्या सुमारे 39 टक्के आहे, असे त्यांनी नमूद केले. डावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 30 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून त्यातून 40 लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पायाभूत सुविधांबाबत त्यांनी सांगितले की, मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये सध्या 173 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग कार्यरत आहे. दरवर्षी 50 किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे हाच विकासाचा खरा उद्देश आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. याचबरोबर, राज्याचा विकास समतोल असावा यावर त्यांनी भर दिला. गडचिरोली, नंदुरबार आणि धुळे यांसारख्या मागास जिल्ह्यांनाही गुंतवणुकीच्या नकाशावर स्थान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक आर्थिक आव्हानांनंतरही महाराष्ट्राने जगातील 30 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून झेप घेतल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांना उद्देशून बोलताना फडणवीस यांनी विशेषतः एलनिनोच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 2026 च्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. कृषी विभागाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करा. त्यामुळे संभाव्य संकट टाळता येईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले. 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य सरकारकडून आवश्यक तयारी सुरू असल्याचे सांगत त्यांनी जलयुक्त शिवार आणि गाळयुक्त शिवार योजनांना गती देण्यात येत असल्याची माहिती दिली. ठिबक आणि तुषार सिंचनाचा अधिक वापर करून पाण्याची बचत करावी, असे आवाहन करत त्यांनी खतं आणि बियाण्यांचा तुटवडा भासू नये यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. कोणतीही नैसर्गिक अडचण आली तरी महाराष्ट्राचा विकास थांबणार नाही. 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी आपण आजपासूनच काम करत आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed