कात्रज बोगद्याजवळ कंटेनर-मोटार अपघात, एकाचा मृत्यू:मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली घटना, दोघे जखमी
![]()
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ कंटेनर आणि मोटारीच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मोटारीतील अन्य दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंबेगाव पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. रघुनाथ मारुती घारे (वय 55, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) असे मृत पावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. अपघातात घारे यांचे नातेवाईक संजय चाळके आणि नात गाथा हे गंभीर जखमी झाले आहेत. मोटारचालक रोहित रघुनाथ घारे (वय 25, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) यांनी याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित घारे, त्यांचे वडील रघुनाथ, वडिलांचे मामा संजय चाळके आणि भाची गाथा हे मोटारीतून मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून जात होते. नवीन कात्रज बोगद्याजवळ भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने अचानक मार्गिका बदलली. कंटेनरचालकाने कोणताही इशारा (इंडिकेटर) न देता मार्गिका बदलल्याने मोटार कंटेनरच्या एका बाजूला आदळली. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अपघातग्रस्त मोटारीतील चौघांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रघुनाथ घारे यांचा मृत्यू झाला. मोटारचालक रोहित घारे यांनी आपल्या फिर्यादीत कंटेनरचालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले असून, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण डोईफोडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान या अपघातामुळे बाह्यवळण मार्गावर वाहतूक कोंडी होऊन रस्त्यावर वाहनांच्या देखील रांगा लागल्या. पोलिसांनी अल्पावधीत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
