पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा:राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण, संचलन ठरले मुख्य आकर्षण

0
6c90477a-9e9f-4156-b039-b678f5168ad7_1777621980824.jpg




पुणे येथे महाराष्ट्र राज्याचा 67 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजीनगर येथील पोलिस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात राज्याच्या नगरविकास, परिवहन आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलिस दलासह विविध विभागांच्या पथकांनी सादर केलेले संचलन आकर्षणाचे केंद्र ठरले. सकाळी ८ वाजता राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे मैदानावर आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि अप्पर जिल्हाधिकारी सतिश राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. ध्वजारोहणानंतर राज्यमंत्र्यांनी पोलिस दल, गृहरक्षक दल, येरवडा कारागृह पोलिस, अग्निशामक दल आणि वन विभागाच्या संचलन पथकांची पाहणी करून मानवंदना दिली. यावर्षीच्या संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर तथा सहाय्यक पोलिस आयुक्त (स्वारगेट विभाग) राहुल आवारे यांनी केले. राखीव पोलिस उपनिरीक्षक संजीवकुमार नाईक सेकंड-इन-कमांडर होते. या पथसंचलनात एकूण 13 प्लाटून सहभागी झाल्या होत्या, ज्यात पुणे शहर पोलिस, पुणे ग्रामीण, पुणे लोहमार्ग, पिंपरी-चिंचवड पोलिस, एसआरपीएफ ग्रुप 1 व 2, येरवडा कारागृह, होमगार्ड, वन विभाग आणि नागरी सुरक्षा दलाच्या पथकांचा समावेश होता. संचलनाचे मुख्य आकर्षण ‘ऑस्कर’ नावाचा श्वान आणि त्याचे पथक होते. डायल 112 वाहन, जलद प्रतिसाद पथक, ‘वरुण’ वाहन, अग्निशामक दलाची गाडी आणि शासकीय रुग्णवाहिका यांसारख्या अत्याधुनिक वाहनांचा ताफाही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. पुणे शहर आणि ग्रामीण पोलिस दलाच्या वाद्यवृंदाने संचलनाला अधिक शोभा आणली. एकूण 20 अधिकारी आणि 304 जवानांनी या संचलनात सहभाग घेतला. या कार्यक्रमात, सन 2025 सालासाठी ‘पोलिस महासंचालक पदक’ जाहीर झालेल्या पुणे शहर आयुक्तालयातील 14 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अभिनंदन केले. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि पोलिस दलाच्या शिस्तीचे व कार्याचे कौतुक केले.

या सोहळ्याला अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) सुहास वारके, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त संजय पाटील, पंकज देशमुख, राजेश बनसोडे, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांसह अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी-चिंचवडचे पोलिस अंमलदार निकम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed