चारधाम यात्रेसाठी गेलेल्या चोपड्याच्या महिलेचे उत्तराखंडमध्ये दुर्दैवी निधन:बद्रीनाथच्या उंबरठ्यावर मृत्यू; बोरोले कुटुंबावर मोठा आघात

0
730-x-548-new-2026-05-01t142230600_1777626173.jpg




चारधाम यात्रेसाठी गेलेल्या चोपडा येथील प्रतिभा नारायण बोरोले यांचे उत्तराखंडमध्ये दुर्दैवी निधन झाले. बद्रीनाथचे दर्शन होण्याच्या आदल्या दिवशीच त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चोपडा शहरातील पंकज नगर परिसरात राहणाऱ्या प्रतिभा बोरोले (वय 59) या धार्मिक भावनेतून चारधाम यात्रेला गेल्या होत्या. त्यांच्या सोबत चोपड्यातील एकूण 16 भाविकांचा गट होता. यात्रेदरम्यान सर्वांनी केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या पवित्र स्थळांचे दर्शन घेतले होते. या यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणून बद्रीनाथ मंदिराचे दर्शन ठरले होते. मात्र, त्या दर्शनाच्या आधीच त्यांची तब्येत अचानक खालावली. रात्रीच्या वेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यामुळे सहप्रवाशांनी तातडीने वैद्यकीय मदतीसाठी प्रयत्न केले. प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना केदारनाथच्या खाली असलेल्या चमोली परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र त्यांची तब्येत सुधारली नाही. अखेर 1 मे रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे चोपडा शहरात शोककळा पसरली आहे. धार्मिक यात्रेदरम्यान असा प्रसंग घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि ओळखीच्या लोकांनी दु:ख व्यक्त केले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे प्रयत्न प्रतिभा बोरोले या माजी नगरसेवक नारायण बोरोले यांच्या पत्नी होत्या. तसेच पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या त्या भावजाई होत्या. उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांच्या त्या काकू असल्याने बोरोले कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधींनी तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी या प्रकरणात प्रयत्न करून आवश्यक मदत केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे पार्थिव मुंबईपर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed