महाराष्ट्रात ईशा फाऊंडेशनचे योग सत्रे, 35 हजार सहभागी:12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 100 हून अधिक ठिकाणी आयोजन




आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ईशा फाऊंडेशनने महाराष्ट्रात १०० हून अधिक योग आणि ध्यान सत्रांचे आयोजन केले. यामध्ये कॉर्पोरेट, शासकीय, शैक्षणिक, आरोग्य सेवा, संरक्षण आणि विविध सामुदायिक ठिकाणांवरील ३५ हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईत वेस्टर्न नेव्हल कमांड, मध्य रेल्वे आणि आयआरसीटीसी यांसारख्या प्रमुख सरकारी संस्थांनी या योग सत्रांमध्ये सहभाग घेतला. कॉर्पोरेट क्षेत्रात एचडीएफसी लाइफ, बीडीओ इंडिया आणि इप्का लॅबोरेटरीज यांसारख्या कंपन्यांमध्येही सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा मंत्रालय, यशदा, पुणे शहर पोलीस, वाहतूक पोलीस दल आणि जीएसटी भवन येथेही राज्यभरात विशेष सत्रे आयोजित करण्यात आली. या अभूतपूर्व प्रतिसादानंतर, आगामी आठवड्यात आणखी १२५ हून अधिक सत्रांचे आयोजन अपेक्षित आहे, ज्यात १० हजारहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. या प्रसंगी सद्गुरू म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय योग दिन हे लक्षात घेण्यासाठी आहे की, ज्याला आपण योग म्हणतो, ते कोणतेही तत्त्वज्ञान, विचारसरणी, श्रद्धाप्रणाली किंवा धर्म नसून ते केवळ आंतरिक कल्याणासाठीचे एक विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. तुमचा धर्म, वंश, जात किंवा लिंग कोणतेही असो, ही तंत्रे शरीराच्या, मनाच्या, भावनांच्या आणि ऊर्जेच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत घेऊन जातात.” देशव्यापी जनजागृती उपक्रमाचा भाग म्हणून ईशा फाऊंडेशनने देशभरात सुमारे १ हजार विनामूल्य योग सत्रांचे आयोजन केले होते. यामध्ये ‘नाडी शुद्धी’ आणि ‘योग नमस्कार’ यांसारख्या प्राचीन साधनांचा समावेश होता. सहभागी नागरिकांना सद्गुरूंनी तयार केलेल्या ‘मिरॅकल ऑफ माईंड’ या सात मिनिटांच्या विनामूल्य मार्गदर्शित ध्यानाची ओळख करून देण्यात आली, ज्याचा जगभरात ३५ लाखांहून अधिक सक्रिय वापरकर्ते लाभ घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *