अंजनगाव बारी येथे श्री रामगीरी महाराज पुण्यतिथी महोत्सव:अखंड रामायण, षोडशी विधी आणि महाप्रसादाने सांगता




अंजनगाव बारी येथील श्री रामगीरी महाराज देवस्थान येथे परमपूज्य मठाधिपती ब्रह्मलीन रामचरणगीरी उर्फ प्रसन्नगीरी गुरू कैलासगीरी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ (बरसी) तीन दिवसीय विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता अखंड रामायण पाठ, षोडशी विधी, संत-महंतांचा सन्मान आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरणात झाली. या महोत्सवानिमित्त १७ जूनपासून अखंड रामचरित पाठ (रामायण) वाचन, आरती आणि पूजा-अर्चा यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी, १८ जून रोजी ब्रह्मलीन प्रसन्नगीरी महाराज यांचा षोडशी विधी धार्मिक परंपरेनुसार पार पडला. या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणांहून सुमारे १७ साधू, महंत आणि संन्यासी उपस्थित होते. उपस्थित संत-महंतांचा सन्मान, आदरातिथ्य तसेच दक्षिणा वितरण मठाधिपती पूज्य शंकरगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, १९ जून रोजी अखंड रामायण पाठाची पूर्णाहुती, श्रीराम आरती आणि श्री रामगीरी महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ब्रह्मलीन प्रसन्नगीरी महाराजांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *