![]()
आम आदमी पार्टीने (आप) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पंजाब दौऱ्याचे प्रतीकात्मक विमान तिकीट भेट दिले. पुणे महानगरपालिकेच्या शाळांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाचे समर्थन करणाऱ्या पाटील यांना दिल्ली मॉडेल हे पुस्तकही देण्यात आले. आप सरकारने सुधारलेल्या पंजाब आणि दिल्लीतील सरकारी शाळा पाहण्यासाठी हे निमंत्रण देण्यात आले आहे. सरकारी शाळा सुधारता येत नाहीत, हा चंद्रकांत पाटील यांचा समज चुकीचा असल्याचे आपने म्हटले आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आप सरकारने हजारो सरकारी शाळांचा कायापालट करून दाखवला आहे. पंजाबच्या शाळांनी नीती आयोगाच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. आप सरकारच्या कार्यकाळात दिल्लीत तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी खासगी शाळा सोडून सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. आम आदमी पार्टीचे शिक्षण व्यवस्था परिवर्तनाचे मॉडेल जागतिक पातळीवर तज्ञांकडून नावाजले गेले आहे. शिक्षणमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष पंजाबला जाऊन शाळांमधील स्मार्ट क्लास, प्रयोगशाळा, शिक्षक प्रशिक्षण आणि ‘हॅपिनेस करिक्युलम’ या उपक्रमांची पाहणी करावी, असे आवाहन आपने केले. तसेच, पुणे मनपाच्या शाळांतील ३२० रिक्त पदे आणि ४० टक्के शाळांना मुख्याध्यापक नसल्याची गंभीर स्थिती त्यांनी डोळ्यांनी पाहावी, असेही आप पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. खासगीकरण हा उपाय नसून, मनपा शाळांमध्ये आर्थिक गुंतवणूक आणि राजकीय इच्छाशक्ती हाच खरा उपाय आहे, असे आपने स्पष्ट केले. आपने चंद्रकांत पाटील यांना वेळ काढून पंजाब दौरा करण्याचे आवाहन केले असून, या दौऱ्याची सर्व जबाबदारी आम आदमी पार्टी उचलेल असे सांगितले. मनपा शाळांचे खासगीकरण म्हणजे भाजप सरकारच्या अपयशाची कबुली आहे. मात्र, पंजाब-दिल्ली मॉडेल पाहिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची भूमिका बदलेल, असा विश्वास आपने व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. अभिजीत मोरे, अमित म्हस्के, मुकुंद किर्दत, रविराज काळे, धनंजय बेनकर, संजय कोने, आरती करंजावणे, सुरेखा भोसले, प्रदीप उदागे, अमोल मोरे, कृणाल घारे, सुहास पवार, शंतनू पांडे, सतीश यादव, सुनील सवदी, नितीन कुटे पाटील, किरण कद्रे, गणेश थरकुडे, ऋषीकेश कनवटे, ऋषीकेश मारणे, शंकर थोरात, निखिल खंदारे, विनोद शिवनकर आणि कुमार धोंगडे उपस्थित होते.
आपकडून शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना पंजाब दौऱ्याचे तिकीट:सरकारी शाळा सुधारणा पाहण्यासाठी निमंत्रण, दिल्ली मॉडेलचे पुस्तकही दिले
