शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबावी, राजू शेट्टींची कृषी आयुक्तांना मागणी:खतांचा सुरळीत पुरवठा; आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
![]()
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा आणि त्यांची आर्थिक लूट थांबावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांची पुण्यात भेट घेतली. औषध कंपन्यांकडून आंबा बागायतदार शेतकऱ्यांची झालेली फसवणूक आणि त्यांना नुकसानभरपाई मिळावी, यावरही त्यांनी भर दिला. राज्यात सध्या शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत. उसाची एफआरपी वेळेवर मिळत नाही, कांद्याला योग्य भाव मिळत नाही, तर पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाला आणि माळरानावरील पिके करपत आहेत. आंबा आणि काजू बागायतदारही अडचणीत सापडले आहेत. वाढती महागाई, खतांची टंचाई, शेतमालाचे ढासळलेले दर, वाढलेली मजुरी आणि वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यावर सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेट्टी यांनी केली. विशेषतः कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांची औषध कंपन्यांनी फसवणूक केली आहे. सुमारे ३५० कोटी रुपयांची बनावट औषधे आणि कीटकनाशके विकल्यामुळे उत्पादन घटले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या कंपन्यांवर तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. युरिया किंवा डीएपीसारख्या अनुदानित खतांसोबत इतर दुय्यम खते किंवा औषधे घेण्याची सक्ती खत कंपन्यांकडून केली जात आहे. यात मंत्री आणि अधिकाऱ्यांची मोठी साखळी कार्यरत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. कृषी आयुक्त मांढरे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी येत्या आठवड्याभरात आंबा बागायतदारांची फसवणूक करणाऱ्या सर्व औषध कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच, पीक विमा कंपन्यांकडून आंबा बागायतदारांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. राज्यात खतांची टंचाई आणि लिंकिंग खत विक्री रोखण्यासाठी ‘उत्तर प्रदेश पॅटर्न’ राबवून शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. नियमबाह्य काम करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती मांढरे यांनी दिली.
