एमआयटी-डब्ल्यूपीयूमध्ये परीक्षेवरून आंदोलन; विद्यार्थी-प्राध्यापकांत हाणामारी:विशेष परीक्षेत पुन्हा नापास झाल्याने विद्यार्थ्यांचा संताप; पोलिसांना पाचारण, गुन्हा दाखल नाही

[ads1]


कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये (एमआयटी-डब्ल्यूपीयू) मंगळवारी ‘इयर-डाऊन’ परीक्षेवरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विशेष परीक्षेत पुन्हा नापास केल्याच्या कथित प्रकारामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये हाणामारी झाल्याचा आरोप आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले, मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. या आंदोलनात विविध विभागांतील विद्यार्थी आणि एका राजकीय पक्षाच्या युवा आघाडीचे सदस्य सहभागी झाले होते. विशेष परीक्षा देऊनही काही विद्यार्थी पुन्हा नापास झाल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि एका प्राध्यापकामध्ये वाद झाला. प्राध्यापकाने प्रथम विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यानंतर उपस्थित काही जणांनी संबंधित प्राध्यापकाला मारहाण केल्याची चर्चा आहे. या घटनेचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण अधिक चर्चेत आले. दरम्यान, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी प्रशासनाने विद्यार्थ्यांशी वाद झाल्याचे आरोप फेटाळले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून विशेष परीक्षेचे आयोजन केले होते, असे विद्यापीठाने म्हटले आहे. या परीक्षेत काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले, मात्र नापास झालेल्या विद्यार्थ्यांना बाहेरील संघटनेने प्रशासनाविरोधात भडकवल्याचा आरोप विद्यापीठाने केला आहे. विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, संबंधित संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर हात उगारला. या घटनेत विद्यार्थी किंवा शिक्षकांचा सहभाग नसल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. विद्यापीठाने ही घटना अवांछित, अनधिकृत आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *