पुण्यात रमेश रेड्डीची गोळ्या झाडून हत्या:मोका जामिनाला विरोध, अवैध धंद्यातील नुकसानीतून वाद
![]()
पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथे रमेश रेड्डी या तरुणाची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून हल्लेखोरांनी रमेशवर नऊ गोळ्या झाडून त्याचा निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश रेड्डी हा त्याचा भाऊ जॉन उर्फ विक्रम रेड्डी याच्या खुनातील आरोपी साबीर शेख, त्याची आई, भाऊ आणि सहकाऱ्यांवर दाखल असलेल्या मोका गुन्ह्यात शेखच्या साथीदारांना जामीन मिळवण्यात अडचण निर्माण करत होता. तसेच, आरोपींनी अवैध व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीत नुकसान झाल्याने त्यांच्या मनात रमेशबद्दल राग होता. याच रागातून हा खून झाल्याचे सांगितले जात आहे. देहूरोड पोलिसांनी याप्रकरणी साबीर शेख, अरमान शेख, लखन आगळे आणि इतरांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विक्रम रेड्डीचा खून १३ फेब्रुवारी २०२५ रोजी देहूरोड परिसरात गोळ्या झाडून करण्यात आला होता. विक्रम त्याच्या मित्राच्या मुलीच्या वाढदिवसाला गेला असताना डीजेच्या आवाजावरून आरोपींशी त्याचा वाद झाला होता. अवैध व्यवसायातील नुकसानीच्या रागातून आरोपींनी विक्रमवर गोळ्या झाडून त्याचा खून केला होता. त्यानंतर पोलिसांनी साबीर शेख, त्याची आई, भाऊ आणि साथीदारांना अटक करून कारागृहात पाठवले होते. त्यांच्यावर मोका कारवाई देखील करण्यात आली होती. आरोपींना जामीन मिळवण्यासाठी वकिलांचा खर्च परवडत नव्हता. रमेश रेड्डीने आरोपींच्या जामिनाला विरोध करत, त्यांना जामीन मिळाल्यास आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. याच वादामुळे आरोपींच्या साथीदारांनी रमेश रेड्डीचा खून केल्याचे समोर आले आहे.
