सह्याद्री हॉस्पिटलचा न्यूरोसर्जरीत जागतिक विक्रम:5 वर्षांत 750 हून अधिक 'एमव्हीडी' शस्त्रक्रिया यशस्वी

0
7b417e5c-2947-4380-a96b-3a173666811a_1777463556050.jpg




पुण्यातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने न्यूरोसर्जरी (मेंदू शस्त्रक्रिया) क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गेल्या पाच वर्षांत हॉस्पिटलने ७५० हून अधिक मायक्रोव्हॅस्कुलर डिकंप्रेशन (एमव्हीडी) शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या विक्रमी कामगिरीमुळे शेकडो रुग्णांना तीव्र वेदनांपासून मुक्ती मिळाली असून, पुणे न्यूरोसर्जरीचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. या ऐतिहासिक यशाची माहिती ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. पंचवाघ आणि त्यांच्या पथकाने गेल्या २२ वर्षांत एकूण २७०० हून अधिक एमव्हीडी शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. एमव्हीडी शस्त्रक्रिया ट्रायजेमिनल न्यूराल्जिया (चेहऱ्याच्या तीव्र वेदना), ग्लोसोफॅरिजियल न्यूराल्जिया आणि हेमिफेशियल स्पॅझम (चेहऱ्याचे स्नायू थरथरणे) यांसारख्या मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर आजारांवर प्रभावी मानली जाते. सह्याद्री हॉस्पिटलमधील या शस्त्रक्रियांचे वार्षिक प्रमाण आंतरराष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. येथे प्रत्येक रुग्णाच्या शारीरिक स्थितीनुसार वैयक्तिक उपचार पद्धती आखली जाते. पत्रकार परिषदेत डॉ. पंचवाघ यांनी सांगितले की, अनेक रुग्ण औषधांवर अवलंबून वर्षानुवर्षे वेदना सहन करतात. औषधांनी उपचार न झाल्यास शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय असतो, परंतु माहितीच्या अभावामुळे योग्य उपचारात विलंब होतो. अचूक निदान, तज्ज्ञांचा सल्ला आणि वेळेवर घेतलेला निर्णय हेच उपचारांच्या यशाचे गमक आहे. डॉक्टरांनी काही विशेष प्रकरणांची माहिती दिली, ज्यात अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. एका रुग्णाच्या मानेच्या वरच्या भागातील संवेदनशील मज्जातंतूजवळची गाठ यशस्वीपणे काढण्यात आली. दुसऱ्या एका प्रकरणात, मेंदूतील मोठी गाठ काढताना मेंदूच्या महत्त्वाच्या कार्यांना कोणताही धक्का न लावता शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यांतच हा रुग्ण दैनंदिन जीवनात परतला आणि त्याने तेलचित्रे काढण्यासही सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed