केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिला निरोप:विद्यार्थ्यांच्या मनात आठवणी दाटून आल्या

0
240_177738544269f0bfe29816c_783a3689da324cb8b0cee1f791cb3bed.jpg




प्रतिनिधी | शिल्लेगाव गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. शाळेचा शेवटचा वर्ग सातवी असल्याने विद्यार्थ्यांचा शाळेशी असलेला प्रवास एका टप्प्यावर थांबला. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरटं कधीही पुन्हा बांधता येईल, क्षितिजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, अशा ओळींनी वातावरण भावूक झाले. कार्यक्रमात भावनांचा सुंदर संगम दिसला. सातवी उत्तीर्ण होताना विद्यार्थ्यांच्या मनात आठवणी दाटून आल्या. अनेकांनी मनोगत मांडले. शाळेतील अनुभव सांगितले. शिक्षकांचे मार्गदर्शन सांगितले. मित्रांसोबतचे क्षण सांगितले. एका डोळ्यात पुढे जाण्याचा आनंद दिसला. दुसऱ्या डोळ्यात शाळा सोडण्याची हुरहूर दिसली. पहिलीच्या प्रवेशावेळी जशी आनंदासोबत थोडी भीती होती, अश्रू होते, तशीच भावना शाळा सोडतानाही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक अशोक पवार सर उपस्थित होते. शाळेचे माजी शिक्षक, बीएमजी संचालक भाऊसाहेब गरजे सर उपस्थित होते. उपसरपंच लक्ष्मण चंदेल उपस्थित होते. शिक्षणप्रेमी नागरिक रवींद्र चंदेल, बाळू राऊत, अनिस बेग, योगिता जाधव, भाऊसाहेब जाधव, गजानन चंदेल, जालिंदर बोहाडे, मोहसीन बागवान, तुकाराम बो-हडे, गव्हाणे दादा उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शांताराम जाधव होते. अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक एम. के. बडोगे यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी स्पष्ट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *