वारंवार वीज खंडितमुळे ग्रामस्थ संतप्त:रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध
![]()
प्रतिनिधी | खुलताबाद ऐन उन्हाळ्यातील उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असताना दिवसभरात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. या गंभीर समस्येकडे महावितरण प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी दि.२७ महावितरण कार्यालयात धडक दिली. ग्रामस्थांना संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या नागरिकांचा रोष अधिकच उफाळून आला. यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला प्रतीकात्मक हार घालून निषेध व्यक्त केला. त्या खुर्चीवरच निवेदन ठेवत प्रशासनाच्या निष्क्रिय व उदासीन कारभारावर नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शूलिभंजन, नंद्राबाद, कागजीपुरा, मावसाळा, खिर्डी, सालुखेडा, सराई आणि सोनखेडा या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा अत्यंत विस्कळीत झाला आहे. दिवसातून वारंवार वीज खंडित होत असून काही भागांत तब्बल १० ते १२ तास वीजपुरवठा बंद राहत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विहिरी व पाण्याच्या टाक्यांसाठी लागणारे विद्युत पंप बंद पडत असल्याने पाणीपुरवठा ठप्प होत आहे. शेतीपंपांना वीज उपलब्ध नसल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले असून उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लघुउद्योग, दुकाने व इतर व्यवसाय देखील विजेअभावी ठप्प होत आहेत. या आंदोलनात खिर्डीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर मातकर, कागजीपुराचे माजी सरपंच शेख अहमद, शूलिभंजनचे सरपंच नितीन जाधव, ऋषिकेश बोडखे, ज्ञानेश्वर वरकड, सुरेश काळे यांच्यासह विविध गावांतील मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
