‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे छत्रपती संभाजीनगरात स्वागत:‘जन्मभूमी ते कर्मभूमी’ असा प्रवास
![]()
प्रतिनिधी |छत्रपती संभाजीनगर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे सोमवारी (२७ एप्रिल) शहरात स्वागत करण्यात आले. बजाजनगर येथील ओएसिस चौकात सोहळ्यासाठी नागरिकांसह, महिलांनी गर्दी होती. बजाजनगर येथे बांधकाम सभापती सचिन गरड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोमवारी शहरात यात्रेचे आगमन होताच, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड यांच्या वतीने स्वागत सोहळ्याचे आयोजन केले. मान्यवरांच्या हस्ते यात्रा रथाचे आणि मंगल कलशाचे विधीवत पूजन करण्यात आले. सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, खासदार रामराव वडकुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती सचिन गरड यांच्यासह भाजप पश्चिम मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होते. ‘जन्मभूमी ते कर्मभूमी’ असा प्रवास करणारी ही ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा’ त्यांच्या महान कार्याला उजाळा देणारी आहे. या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा आणि जनतेमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संकल्प आहे.
