खत लिंकिंग बंद करा:वैजापुरात निविष्ठा विक्रेत्यांचा कडकडीत बंद
![]()
प्रतिनिधी | वैजापूर रासायनिक खतांच्या पुरवठ्यात कंपन्यांकडून केली जाणारी लिंकिंग पद्धत तात्काळ बंद करावी, या प्रमुख मागणीसह प्रश्न सोडवावे, या मागणीसाठी वैजापूर तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र फर्टीलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. खतांचा पुरवठा करताना कंपन्यांकडून दुकानदारांना लिंकिंग देण्यात येत असल्याने विक्रेत्यांना एमआरपी पेक्षा अधिक दराने खत खरेदी करावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, शेतकऱ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याने ही पद्धत तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात यावी. प्रमाणित बियाण्यांसाठी साथी पोर्टलची सक्ती विक्रेत्याऐवजी उत्पादक कंपन्यांवर करावी, खतांचा पुरवठा एफओआर पद्धतीने करावा, तसेच विक्रीवरील मार्जिन वाढवावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाकडून गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांच्या प्रलंबित रकमा तातडीने अदा कराव्यात, तसेच मुदत बाह्य कीटकनाशके कंपन्यांनी परत घ्यावीत, अशा मागण्यांचाही यात समावेश आहे. सोमवारी कृषी दुकानदारांनी उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांना निवेदन दिले. य प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार सोनी, सचिव बाळासाहेब मतसागर आदींसह कृषी दुकानदारांची उपस्थिती होती.
