डॉ. प्रज्ञा सातवांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी:बाहेरून आलेल्या उमेदवाराला झुकते माप दिल्याने हिंगोलीतील निष्ठावंत नाराज
![]()
काँग्रेस मधून भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी विधान परिषद सदस्य डॉक्टर प्रज्ञा सातव यांना भाजपने विधान परिषद उमेदवारीची भेट दिली आहे. आता पुढील काळात त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या उमेदवारीमुळे निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. हिंगोली भाजपमध्ये मागील काही दिवसांमध्ये इतर पक्षातून भाजप प्रवेश केलेल्या उपऱ्यांनाच पक्षांमध्ये पदे दिली जाऊ लागली आहेत. या प्रकारामुळे निष्ठवंतांमधून तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला आहे. जिल्हा व शहर पातळीवरच्या कार्यकारिणीचीवरही उपऱ्यांना संधी मिळाल्यामुळे निष्ठावंतांनी काय सतरंज्याच उचलायच्या का? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला. मात्र शिस्तीच्या या पक्षामध्ये बोलण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्यामुळे निष्ठावंतांमध्ये तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. काँग्रेसकडून दोनवेळा विधान परिषदेची संधी दरम्यान माजी खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांना पाठबळ दिले. त्यांना दोन वेळा विधान परिषदेची संधीही दिली. विशेष म्हणजे दुसऱ्या वेळी काँग्रेस पक्षामधूनच अंतर्गत विरोध होत असतानाच डॉक्टर सातव यांनी थेट दिल्ली दरबारातून आपली उमेदवारी पदरात पाडून घेतली. मात्र विधान परिषदेचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि विधान परिषदेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या राजकीय भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळातून मोठी चर्चा सुरू झाली होती. आमदारकीनंतर मंत्रिपद मिळण्याची चर्चा विशेष म्हणजे भाजपने डॉक्टर प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी व त्यानंतर मंत्रिपद देण्याची आश्वासन दिल्यामुळेच त्यांनी भाजपत प्रवेश केल्याची जोरदार चर्चा रंगू लागली होती. आता विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपने पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून, पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे आता भाजपने त्यांना पक्षात येण्यासाठी उमेदवारी व मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. या निवडणुकीनंतर डॉक्टर सातवांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे. निष्ठावंतांमधून असंतोषाची भावना दरम्यान मागील अनेक वर्षापासून भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंतांना मात्र यावेळी बगल देण्यात आली आहे. या प्रकारामुळे निष्ठावंतांमधून असंतोषाची भावना व्यक्त होऊ लागली असली तरी, याबाबत उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नसल्याचे चित्र आहे. मागील काही वर्षात काँग्रेसमध्ये असताना भाजपवर टीकेची झोड उठवणाऱ्या प्रज्ञा सातवांना भाजपने उमेदवारी दिल्याने त्यांचा पक्षाला कितपत फायदा होईल? हे मात्र सांगणे कठीण झाले आहे.
