जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू:एकाला वाचवताना दुसऱ्यानेही गमावले प्राण, बल्लाळवाडीत शोककळा
![]()
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या बल्लाळवाडी येथे मंगळवारी दुपारी एक दुःखद घटना घडली. शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या सोहम जयसिंग नवले (वय १२ वर्षे) आणि विघ्णेश महेश पवार (वय ८ वर्षे) या दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण बल्लाळवाडी गावावर आणि जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास बल्लाळवाडी येथील डॉक्टर विनोद ढवळे यांच्या शेततळ्यात ही दुर्घटना घडली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने गावातील काही मुले एकत्र जमली होती. सोहम नवले हा शेततळ्यात एका दोरीच्या साहाय्याने पोहण्यासाठी उतरला होता. पोहताना अचानक ती दोरी तुटली आणि सोहमचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडू लागला. आपल्या मित्राला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी जवळच असलेल्या ८ वर्षांच्या विघ्णेश पवारने पाण्यात उडी घेतली. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खोली जास्त असल्याने विघ्णेशही पाण्यात बुडाला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या कार्तिक नवले या तिसऱ्या मुलाने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केला. कार्तिकचा आवाज ऐकून आसपासचे ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले. ग्रामस्थ आणि बचाव पथकाने अथक प्रयत्न करून सोहम आणि विघ्णेश या दोघांनाही पाण्याबाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी विकास वसंत पवार (वय २८, रा. बल्लाळवाडी) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. ओतूर पोलिसांनी बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे घटनेची नोंद केली आहे. जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.
