मला खुश कर, तरच सुट्टी मिळेल:वरिष्ठ अधिकाऱ्याची महिलेकडे शरीरसुखाची मागणी, जळगावच्या कंपनीतील संतापजनक प्रकार

0
db-temp-cover-marathi-2026-04-28t205202949_1777389817.jpg




नाशिकच्या अशोक खरात आणि आयटी कंपन्यांमधील अत्याचार प्रकरणांची शाई वाळते न वाळते, तोच जळगाव जिल्ह्यातील बांभोरी येथील ‘अॅस्टोमो’ कंपनीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या आजारी मुलीसाठी सुट्टी मागणाऱ्या पीडितेकडे “मला खुश कर, तरच सुट्टी मिळेल,” अशी निर्लज्ज मागणी करत या नराधम अधिकाऱ्याने तिचा छळ केला. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात जनार्दन नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या आरोपी फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला बांभोरी येथील अॅस्टोमो कंपनीत कामाला आहे. तिच्या मुलीची प्रकृती बिघडल्याने तिने सुट्टीसाठी वरिष्ठ अधिकारी जनार्दन याच्याकडे विनंती केली होती. यावर संतापजनक भूमिका घेत अधिकाऱ्याने म्हटले, “तू खूप सुंदर आहेस, मला तू आवडतेस. तू मला खुश कर, मग मी तुला दोन दिवस काय, दहा दिवसांची सुट्टी देईन आणि तुझा पगारही कापणार नाही.” प्रतिकार करताच पीडितेला मारहाण पीडितेने या कृत्याचा तीव्र प्रतिकार केला असता, आरोपीने तिला कानशिलात लगावून जमिनीवर पाडले आणि तिचा विनयभंग केला. इतकेच नाही तर, “माझ्या ओळखीचे मोठे गुंड आणि राजकारणी आहेत. जर तू कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,” अशी धमकी दिली. आरोपीने एका आक्षेपार्ह व्हिडिओचा धाक दाखवून तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडितेने धरणगाव पोलिसांत तक्रर केली आहे. इतर मुलींना जाळ्यात ओढण्याचे दडपण पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेवर आणखी एक भयानक अट घातली. “कंपनीमध्ये ज्या नवीन मुली कामाला येतात, त्यांना तू मला खुश करण्यासाठी तयार कर. तू माझे हे काम केले तर मी तुला पुन्हा त्रास देणार नाही,” असे म्हणून तिला वेश्याव्यवसायासारख्या दलदलीत ढकलण्याचा प्रयत्नही केला. गेल्या सात महिन्यांपासून हा छळ सुरू होता. अखेर पीडितेने हिंमत एकवटून कुटुंबासह पोलिस ठाणे गाठले. आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू धरणगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. “आरोपी जनार्दन हा सध्या फरार आहे, मात्र त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्याला अटक करण्यात येईल,” अशी माहिती पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे. एका प्रतिष्ठित कंपनीत महिलांची अशा प्रकारे पिळवणूक होत असल्याने कामगार वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा विकृत मानसिकतेच्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed