हंतोडा येथे वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित:नागरिकांनी रात्र जागून काढली, महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप

0
4a615afa-4b9c-46d4-824d-0c64194f6e7d_1777386825737.jpg




अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा गावात सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी अमरावती जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसहून अधिक होते, त्यामुळे नागरिक दिवसभर उकाड्याने त्रस्त होते. सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळाचा जोर इतका होता की अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. लखाड, शिरजगाव, दहीगाव, अंजनगाव सुर्जी, हंतोडा, चिंचोली, रहीमापूर आणि मुऱ्हा या भागांत जोरदार वारे आणि पावसाने हजेरी लावली. हंतोडा येथे तर विद्युत खांब कोसळल्याने संपूर्ण गावाचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक रहिवासी आणि भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष रवी गोळे यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी ‘सध्या कर्मचारी येऊ शकत नाहीत’ असे उत्तर दिल्याने नागरिकांचा नाईलाज झाला. गोळे यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. रात्रभर वीज नसल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर पडलेल्या विद्युत खांबांमध्ये वीजप्रवाह आहे की नाही, याबाबत खात्री नसल्याने मोठ्या अपघाताची भीतीही निर्माण झाली होती. या संपूर्ण प्रकारामुळे महावितरण कंपनीच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना अशा परिस्थितीत योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed