राज्यपालांच्या हस्ते भारतीय विद्यापीठ संघाच्या महासभेचे उद्घाटन:डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात 100 व्या शताब्दी परिषदेला सुरुवात

0
6002b6da-7440-4c2d-8d75-c77a6fc04379_1777372455273.jpg




महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज्’ (AIU) च्या १०० व्या वार्षिक महासभेचे आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. ही परिषद २८ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचा मुख्य विषय “ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे” हा आहे. यावेळी बोलताना राज्यपाल वर्मा यांनी नवोन्मेष, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षणातूनच ‘विकसित भारत’ घडवता येईल, असे प्रतिपादन केले. प्रगतीचे फायदे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञानार्जन न करता समाजात संधी निर्माण करणारे आणि समस्या सोडवणारे सक्षम नागरिक बनावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. ‘विकसित भारत २०४७’ च्या प्रवासात नवोपक्रम आणि संशोधन केंद्रस्थानी असेल, असे सांगत त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ ते ‘जय विज्ञान’ आणि ‘जय अनुसंधान’ या प्रवासात विद्यापीठांनी पुढाकार घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उच्च शिक्षणात ५० टक्के प्रवेश प्रमाण गाठण्याचे उद्दिष्ट ठेवतानाच, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश शिक्षणात करण्यावर त्यांनी भर दिला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांनी सामाजिक मूल्यांची आठवण करून दिली. भारतीय विद्यापीठ संघाच्या या शताब्दी परिषदेसाठी देशभरातून ३०० हून अधिक कुलगुरू, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि धोरणकर्ते एकत्र आले आहेत. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील, डॉ. सोमनाथ पी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव आणि विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते ‘युनिव्हर्सिटी न्यूज’चा विशेषांक, तसेच “असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज्: अ सेंच्युरी ऑफ इव्होल्युशन, ट्रान्सफॉर्मेशन अँड लीडरशिप” आणि “ट्रान्सफॉर्मेटिव्ह हायर एज्युकेशन @२०४७” या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिक्षणाने केवळ ज्ञान देऊन चालणार नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण केली पाहिजे. ही परिषद भारतीय मूल्यांवर आधारित आणि जागतिक बदलांशी सुसंगत अशी उच्च शिक्षणाची नवी दिशा निश्चित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी एआययूचे अध्यक्ष प्रा. विनय कुमार पाठक, सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल, कुलगुरू प्रा. डॉ. एन. जे. पवार यांच्यासह देशातील अनेक नामवंत शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed