तरुणाचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला:फरार आरोपीला सहा वर्षांनी बेड्या, खराडी पोलिसांची पुण्यात कारवाई

0
5ff41dc2-2f97-4458-958a-0f315033be71_1777373782502.jpg




खराडी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. तेजस अमृत ढेरे (वय ३६, रा. मुंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने एका तरुणाचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकून दिला होता. ही घटना २०१९ मध्ये चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. राहुल शिवाजी शेलार (वय २४, रा. दातेवाडी, सातारा) याचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी शेलारचा मृतदेह नदीपात्रात टाकून दिला होता. या प्रकरणी शेलारच्या मित्राने फिर्याद दिली होती. शेलार खराडीतील एका लॉजमध्ये थांबला असताना, आरोपी ढेरे आणि त्याच्या साथीदारांनी त्याला बाहेर फिरायला जाण्याच्या बहाण्याने बोलावले आणि त्याचा खून केला. आरोपींनी फिर्यादीला धमकावून त्याचे दोन मोबाईल, सोनसाखळी, सोन्याचे कडे, घड्याळ आणि एक मोटार असा एकूण तीन लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. या प्रकरणात यापूर्वी सात आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र मुख्य आरोपी तेजस ढेरे फरार होता. आरोपी तेजस ढेरे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध खडक, शिरूर, मुंढवा आणि चंदननगर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. २५ एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास तो खराडी परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकातील पोलिस कर्मचारी दत्तात्रय खरपुडे आणि अशोक केदार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून एक मोटार जप्त करण्यात आली आहे. परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक रवींद्र चव्हाण, उपनिरीक्षक राहुल कोळपे, दत्तात्रय खरपुडे, अशोक केदार, महेश नाणेकर, श्रीकांत कोद्रे, सूरज जाधव, विलास केदारी आणि साहेबराव गुंडाळे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed