हिंगोली जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी:राज्य सेवा हक्क आयोगाकडून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा विशेष सन्मान
![]()
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत मंगळवारी ता २८ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित “द्वितीय सेवा हक्क दिन” निमित्त झालेल्या विशेष सोहळ्यात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक अर्जांचा विहित कालावधीत निपटारा करण्यात हिंगोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने संपूर्ण राज्यासाठी आदर्श निर्माण केला असून, राज्यातील इतर जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा विशेष सन्मान जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार आज मुंबई येथे राज्यस्तरीय सोहळा महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा यथोचित गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सेवा हक्क अधिनियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्व विभागांना वेळोवेळी सूचना, आढावा बैठक, ऑनलाइन अर्ज निपटारा यंत्रणा बळकट करणे, प्रलंबित प्रकरणांवर विशेष लक्ष आणि नागरिकाभिमुख प्रशासन या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिपाक म्हणून हिंगोली जिल्ह्याने राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली असल्याचे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्याच्या या यशामुळे जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून, नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक व उत्तरदायी सेवा देण्याच्या दिशेने प्रशासनाचा आत्मविश्वास आणखी वृद्धिंगत झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
