छत्रपती संभाजीनगर मनपात 10 स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्र:महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत कार्यक्रम; विकासकामांमध्ये सहभागाचे आवाहन
![]()
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयातील प्रशासकीय समिती सभागृहात आज नामनिर्देशित स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात 10 नवीन स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांची प्रमुख उपस्थिती होती. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रमाणपत्रांसोबतच स्वीकृत सदस्यांना महापालिकेची सेरेमोनियल कॅप, शाल आणि सभागृह कामकाज व नियमावलीवर आधारित पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वीकृत सदस्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. महानगरपालिकेच्या विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
