एसटीपी उभारणार तीन नवे सेंटर ऑफ एक्सलन्स:पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कची घोषणा
![]()
पुणे विद्यापीठाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कतर्फे (एसटीपी) लवकरच तीन नवीन ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करण्यात येणार आहेत. एसटीपीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट’, ‘पॉलिसी रिसर्च’ आणि ‘जिओइन्फॉरमॅटिक्स व ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर’ या तीन सेंटर ऑफ एक्सलन्सचा समावेश आहे. या कार्यक्रमात एसटीपीच्या चार दशकांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव पद्मश्री आशुतोष शर्मा, एसटीपीचे महासंचालक राजेंद्र जगदाळे, अध्यक्ष दिलीप बंड आणि उपाध्यक्ष प्रताप पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एसटीपीच्या गेल्या चार दशकांतील कामगिरीचा आढावा घेताना महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी सांगितले की, एसटीपीने आतापर्यंत १३७२ स्टार्टअप्सना इनक्युबेशन सेवा पुरवली आहे. तसेच, २६० स्टार्टअप्सना १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतचे निधी मिळवून दिले आहेत. डॉ. जगदाळे पुढे म्हणाले की, एसटीपीच्या माध्यमातून देशातील सर्व राज्यांमध्ये विविध क्षेत्रांतील एकूण ६५९ प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. याशिवाय, २६ नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करून त्यांना यशस्वीपणे बाजारपेठेत आणण्यात आले आहे. बौद्धिक स्वामित्व सल्लागार ॲडव्होकेट राघवेंद्र पोंक्षे यांनी यावेळी सांगितले की, एसटीपी गेल्या ४० वर्षांपासून नवोपक्रम आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे. भविष्यात नवीन उद्योजक आणि तज्ञांना मदत करण्यासाठी येथे नाविन्यता आणि तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स उभारले जातील. यामुळे नवीन संशोधनासोबतच भारतातील तंत्रज्ञानाला बळकटी मिळेल आणि नव्या पिढीतील तरुणांना याचा चांगला फायदा होईल, असेही पोंक्षे यांनी नमूद केले. योगेश पवार यांनी सांगितले की, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क हे भारत आणि जगादरम्यान एक महत्त्वाचा दुवा आहे. येथे अनेक विषयांवर काम झाले असून, स्टार्टअप कंपन्यांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात नवीन गुंतवणूक येत असल्याने, नवीन संशोधनासाठी येथे खूप वाव आहे.
