कांदा उत्पादकांना कवडीमोल भाव; शेतकरी संकटात:कुऱ्हा परिसरात लागवडीचा खर्चही निघेना, शासनाच्या हस्तक्षेपाची मागणी
![]()
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा परिसर कांदा उत्पादनाचे आगर म्हणून ओळखला जातो. या भागातील मारडा आणि इतर गावांतील कांदा सर्वदूर प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुढे आली आहे. कांदा लागवडीचा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पादन यावर कांद्याच्या विक्रीचा भाव अवलंबून असतो. परंतु वाढत्या महागाईमुळे लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. कांद्याच्या बियाणांपासून ते खते, कीटकनाशके, ओलीताची पाणीपट्टी, वीज बिल आणि मशागतीची मजुरी या सर्वांचा खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नाही. सध्या कांद्याचे भाव ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर हे पीक घ्यावे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा कोणताही माल शेताबाहेर पडला की त्याला योग्य भाव मिळत नाही, मात्र पेरणीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करताना महागाईचा सामना करावा लागतो, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे. बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीचा खर्च पाहता शेती करणे अत्यंत अवघड झाले आहे. या गंभीर परिस्थितीकडे शासन मात्र कोणतीही दखल घेत नाही. सरकार केवळ पोकळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे कांद्याला योग्य भाव मिळावा, अशी अपेक्षा या भागातील सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
