आरोग्य संपन्न गाव' अभियानासाठी जि.प. सीईओंचे निर्देश:अमरावतीत 'माझं गाव-आरोग्य संपन्न गाव' अभियानासाठी कार्यशाळा
![]()
राज्य शासनाच्या ‘माझं गाव-आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी या अभियानासाठी वर्षभराचा कृती आराखडा तयार करण्याचे आणि ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात नुकतीच जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सीईओ सत्यम गांधी यांनी आवाहन केले की, या अभियानासाठी योग्य आखणी आणि सूक्ष्म नियोजन करून ग्रामस्तरीय समित्या सक्रिय कराव्यात. याच समित्यांना अधिक सक्षम करण्यासाठी तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करून वर्षभराचा आराखडा तयार करावा. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत स्थानिक ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात ही जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. सीईओ सत्यम गांधी यांनी अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीराम कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण परिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बनसोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र सिरसाट, डॉ. क्षीरसागर, डॉ. स्वप्नील मालखेडे, डॉ. शरद जोगी, डॉ. पूनम मोहोकार तसेच समता फाउंडेशनचे रजनीकांत बिरजवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सीईओ गांधी यांनी पुढे सांगितले की, या अभियानाचा नियमित आढावा विभाग प्रमुखांच्या बैठकीत घेतला जाईल. त्यामुळे तालुकानिहाय नियोजन करून जिल्हास्तरावर एकत्रित आराखडा तयार करावा आणि त्यानुसार काम सुरू करावे. यंत्रणेने नियमित कामकाज अधिक सुदृढ करत या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी नमूद केले. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात सनियंत्रण समिती अंतर्गत ‘गाव कृती समिती’ या विषयावर डॉ. सालफळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच परिशिष्ट अ, ब व क यावर अनुक्रमे डॉ. निकोसे व डॉ. अंकुश मानकर यांनी माहिती दिली. अंतिम अंमलबजावणी या घटकांतर्गत प्रवेशिका सादरीकरण या विषयावर डॉ. सोनाली देशमुख, पुरस्कार स्वरूपाबाबत डॉ. शिल्पा बोरकर आणि कृती आराखड्याविषयी डॉ. तिलोत्तमा वानखडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण परिसे यांनी केले. डॉ. अंकुश मानकर व डॉ. सोनाली देशमुख यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. स्वप्नील मालखेडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
