पुण्याच्या बुधवार पेठेत मोठी कारवाई:पोलिसांकडून बांगलादेशी रॅकेटचा पर्दाफाश, 4 कुंटणखाने सीलबंद; 3 महिलांना बेड्या

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-27t220759135_1777307946.jpg




पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील न्यू वेलकम, बेगम आणि दाणे आळी येथील इमारतींमधील एकूण 4 फ्लॅट फरासखाना पोलिसांनी एका वर्षासाठी सीलबंद केले आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, कुंटणखान्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या जागांवर ही कडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी महिलांनाही अटक केली असून, कुंटणखाना चालविणारे तसेच या कृत्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या संशयितांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. बुधवार पेठ परिसरात सुमारे महिन्याभरापूर्वी तीन बांगलादेशी महिला कोणत्याही वैध परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यावर छापा टाकला असता जोशना शकुर अली, कलसुम खातून आणि अंजुरा बेगम या तीन संशयित महिला पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या. प्राथमिक चौकशीत या तिन्ही महिला मूळच्या बांगलादेशच्या असून गेल्या महिन्याभरापासून भारतात छुप्या पद्धतीने वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात या महिला पुण्यात वेश्याव्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिक असल्याचे ठोस पुरावे आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. परकीय नागरिक नोंदणी कायदा आणि इतर संबंधित कलमान्वये याप्रकरणी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. 4 कुंटणखाने सीलबंद, एजंटांविरुद्धही कठोर गुन्हे दाखल होणार पुणे शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली असून, गेल्या काही महिन्यांत 40 पेक्षा अधिक बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे. झोन 1 चे पोलिस उपायुक्त हृषिकेश रावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजंटांमार्फत या महिलांना पुण्यात आणले जाते आणि ठराविक इमारतींमध्ये त्यांचे वास्तव्य व अनैतिक व्यवसाय चालतो. या पार्श्वभूमीवर आज 4 कुंटणखाने सीलबंद करण्याची मोठी कारवाई करण्यात आली. स्थानिक लोकांच्या मदतीने चालणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिस सध्या सक्रिय असून, अवैध नागरिकांना आश्रय देणाऱ्या एजंटांविरुद्धही कठोर गुन्हे दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed