बुधवार पेठेतील ४ कुंटणखाने सील:अनैतिक व्यापार प्रकरणी ३ बांगलादेशी महिलांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई

0
39f32d7d-5ff5-45f1-a18f-a0fee67be93e_1777285274879.jpg




पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी व्यापारासाठी वापरले जाणारे चार कुंटणखाने एक वर्षासाठी सील केले आहेत. या कारवाईत भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांनाही अटक करण्यात आली आहे. फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली. फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‘न्यू वेलकम’, ‘बेगम बिल्डिंग’ आणि ‘दाणे आळी’ येथील जुन्या वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुंटणखाने चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी या इमारतींमधील फ्लॅट सील करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला होता. मिळालेल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करून, पोलिस आयुक्तांनी संबंधित ठिकाणे सील करण्याचे आदेश दिले. यामध्ये बेगम बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक ३०१, न्यू वेलकम बिल्डिंगमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील दोन फ्लॅट आणि दाणे आळीतील अग्रवाल मावावाला वाड्यातील उत्तर बाजूचा एक रूम, असे एकूण चार फ्लॅट पुढील एक वर्षासाठी सीलबंद करण्यात आले आहेत. याच कारवाईदरम्यान, पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी रेड लाईट एरियामध्ये अवैधपणे राहणाऱ्या विदेशी नागरिकांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार केलेल्या कारवाईत जोशना शकुर अली, कुलसुम खातून आणि अंजुरा बेगम या तीन बांगलादेशी महिलांना संशयास्पदरीत्या फिरताना पकडण्यात आले. या महिला मागील एका महिन्यापासून विनापरवाना भारतात राहत असून वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांचा शोध घेत होत्या. त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे मिळाल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही धडक कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे आणि पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये फरासखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे, महिला पोलिस उपनिरीक्षक पूजा जाधव आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed