'केईएम'च्या नामांतरावरून राजकीय रणकंदन:मंत्री लोढांचा 'एकलव्य'चा प्रस्ताव; ठाकरेंच्या आमदारांचा विरोध, आंदोलनाचा इशारा
![]()
मुंबईतील ऐतिहासिक ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (केईएम) रुग्णालयाचे नाव बदलून ते ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करण्याच्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रस्तावामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रस्तावाला पालिकेच्या आरोग्य समितीने प्राथमिक मंजुरी दिल्याचे समजताच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याविरोधात रस्त्यावरच्या लढाईची हाक दिली आहे. या नामांतरामुळे मुंबईची अस्मिता आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मुंबईतील सार्वजनिक आरोग्याची वाहिनी मानल्या जाणाऱ्या केईएम (KEM) रुग्णालयाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. ब्रिटीशकालीन नाव बदलून त्याला भारतीय चेहरा देण्याच्या प्रयत्नांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कडाडून विरोध केला असून, या वादात आता मुख्यमंत्री आणि सर्वसामान्य मराठी जनतेलाही साद घातली जात आहे. काय आहे लोढांचा प्रस्ताव? मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहून सुचवले आहे की, रुग्णालयाचे ब्रिटीशकालीन नाव बदलून ते भारतीय संस्कृतीला साजेसे असावे. विशेष म्हणजे, ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ असे नाव ठेवल्यास त्याचे संक्षिप्त रूप ‘KEM’ हेच कायम राहील, असा युक्तिवाद लोढा यांनी केला आहे. “आपण अजूनही ब्रिटिशांच्या नावांची माळ का जपतोय? असा सवाल करत, ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी सार्वजनिकरित्या सांगावे की त्यांना किंग एडवर्ड का आवडतात?” असे आव्हान लोढा यांनी विरोधकांना दिले आहे. ठाकरेंच्या दोन आमदारांचा आक्रमक पवित्रा केईएम रुग्णालयाच्या नामांतराच्या विरोधात शिवसेनेचे ठाकरे गटाचे दोन आमदार आक्रमक झाले आहेत. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. “केईएमचे नाव बदलत असाल तर उद्या इतर ऐतिहासिक वास्तूंचीही नावे बदलणार का?” असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईचे ‘लोढा मॅन्शन’ होऊ देणार नाही! आमदार अजय चौधरी यांनी समाजमाध्यमावर अत्यंत तिखट पोस्ट लिहित मराठी माणसांना साद घातली आहे. “तुमची मुंबई तुमच्या हाती राहिली आहे का? ती तर लोढांची झाली आहे,” असे म्हणत त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या (Dean) दालनाबाहेर निदर्शने करण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे. अजय चौधरी यांनी आपल्या टीकेत “नाहीतर मुंबईचे लोढा मॅन्शन झालेच समजा,” असा इशारा देत हा लढा अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. रुग्णालयाच्या नामांतराला डॉक्टरांचाही (मार्ड) विरोध केवळ राजकीय पातळीवरच नव्हे, तर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ ने देखील रुग्णालयाच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. “रुग्णालयाशी संबंधित वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टरांना विश्वासात न घेता असा परस्पर निर्णय घेऊ नये,” अशी भूमिका ‘मार्ड’ने मांडली आहे. एकीकडे भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा मुद्दा मांडला जात असताना, दुसरीकडे रुग्णालयाची वर्षानुवर्षांची ओळख बदलण्यावरून निर्माण झालेला हा पेच लवकर सुटणार का? हे पाहावे लागणार आहे.
