उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यात वादळी पावसाचा इशारा:पारा 42 अंशांच्या पार, पुढील 4 दिवस महत्त्वाचे; हवामान विभागाचा इशारा

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-24t204657112_1777043784.jpg




राज्यात सध्या उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाचे सावट असे दुहेरी वातावरण पाहायला मिळत आहे. विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेचा कहर सुरू असून अकोला आणि वाशिम जिल्ह्यांत तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 3 ते 4 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही जाणवणार आहे. गेल्या 24 तासांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पारा 40 अंशांच्या वर राहिल्याने नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 24 आणि 25 एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात 28 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावू शकतो. तसेच कोकण आणि गोव्यातही 24 एप्रिल रोजी काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. या काळात वाऱ्याचा वेग 30 ते 50 किमी प्रतितास राहण्याची शक्यता असल्याने शेती पिकांचे आणि झाडांचे नुकसान होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. केंद्रीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा कडाका आणि उकाडा अधिक जाणवणार आहे. या वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात, त्यामुळे दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे आणि उन्हापासून संरक्षणासाठी हलके व सैल सुती कपडे वापरावेत, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या लाटेसोबतच काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठीही विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी हलके पाणी द्यावे, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंगचा वापर करावा आणि नवीन लागवडीचे तीव्र उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ‘शेड नेट’चा आधार घ्यावा. हवामानातील या अनिश्चित बदलांमुळे उद्भवू शकणारी परिस्थिती लक्षात घेता, शेतकरी आणि नागरिकांनी हवामान अंदाजाचा वेळोवेळी आढावा घेऊन सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed