स्वारातीम विद्यापीठात स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२६चे आयोजन;प्रवेशासाठी अंतिम दि. ३० एप्रिल, २०२६
नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संल्पनेतून विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती व क्रीडा कौशल्य विकासासाठी ‘स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया (PEFI) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर राबवले जाणार असून, ०१ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत शिबिर पार पडणार आहे.
या उन्हाळी शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला असून विविध मैदानी व इनडोअर खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मैदानी खेळांमध्ये ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, खो-खो, क्रिकेट, कबड्डी, बास्केटबॉल आणि हॉकीचा समावेश आहे. तर इनडोअर व इतर प्रकारांमध्ये जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, एरोबिक्स, बॉक्सिंग, योगा, वेटलिफ्टिंग तसेच फिजिकल फिटनेस प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची भव्य खेळाची मैदाने व आधुनिक इनडोअर स्टेडियमची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील अनुभवी प्रशिक्षक व तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे. शिबिरार्थ्यांसाठी मोफत बस सेवा तसेच मोफत टी-शर्टचीही सोय करण्यात आली आहे.
०५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले व मुली यांना या शिबिरात सहभागी होता येणार असून, दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत प्रशिक्षण दिले जाईल. शिबिरासाठी प्रवेश शुल्क १५०० रुपये निश्चित करण्यात आले असून नोंदणीची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२६ आहे. हे शिबिर विद्यापीठ परिसरातील इनडोअर स्पोर्ट्स हॉल येथे आयोजित करण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी इच्छुक पालक व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्याथी, पालक व शाळेचे मुख्याध्यापक यांना करण्यात आले आहे. उन्हाळी सुटीचा सदुपयोग करत मुलांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी ही उत्तम संधी असल्याचे डॉ. भास्कर माने, डॉ. भीमा केंगळे, डॉ. कुलजीत राणा व डॉ. पारस यादव यांनी सांगितले आहे.
Post Views: 114
