वानवडी पोलिसांकडून २८ लाखांचे अमली पदार्थ जप्त:सराईत तस्कराला अटक, पिस्तूल-काडतुसेही हस्तगत
![]()
पुणे शहरात अमली पदार्थविरोधी मोहिमेला वेग आला आहे. वानवडी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत २८ लाखांहून अधिक किमतीचा अमली पदार्थ आणि बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका सराईत फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. अक्रम अजिज शेख (वय ३२, रा. गुलटेकडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २७ लाख ६० हजार रुपये किमतीचे ९२० ग्रॅम अमली पदार्थ, एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे असा एकूण २८ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एनडीपीएस गुन्ह्यात फरार असलेला अक्रम शेख पुणे कॅम्प परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कॅम्प परिसरात सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. अक्रम शेखची अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान पोलिसांना पांढऱ्या रंगाची २७ लाख ६० हजार रुपये किमतीची ९२० ग्रॅम अमली पावडर मिळाली. तसेच, त्याच्याकडे ४७ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुल, दोन मॅगझीन आणि सात जिवंत काडतुसे सापडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फ़ाज शेख, पोलीस हवालदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, पोलीस अंमलदार अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अर्शद सय्यद, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, विष्णू सुतार, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, राहुल माने, महिला पोलीस अंमलदार सुषमा घोळवे आणि रक्षा राहुलकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपीने हा अमली पदार्थ आणि शस्त्रसाठा कोठून आणला, तसेच त्याचे पुणे परिसरातील कोणाशी लागेबांधे आहेत, याचा सखोल तपास वानवडी पोलीस करत आहेत.
