अरिजितसिंगच्या मृत्यू प्रकरणातील साईलाला आणि इंगळेला चार दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-4 एप्रिल रोजी खून झालेल्या अरिजितसिंग गजानन चव्हाण याच्या मृत्यू प्रकरणात आता एकूण अटक आरोपींची संख्या 8 झाली आहे. सोबत दोन मरण पावलेले आरोपी सुध्दा आहेत. या प्रकरणात आणखी अनेक आरोपी फरार आहेत. आज न्यायालयात हजर केलेल्या साईसिंग उर्फ साईलाला आणि नितेश इंगळे या दोघांना न्यायालयाने चार दिवस अर्थात 28 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
4 एप्रिल 2026 रोजी शहरातील डी मार्टजवळ अरिजितसिंग उर्फ प्रफुल्ल गजानन चव्हाण या युवकाचा खून झाला होता. दोन गटात झालेल्या या हाणामारीत दुसऱ्या गटातील सय्यद आवेज सय्यद खलील (27) आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (23) या दोघांचाही मृत्यू झाला होता. हे मरण पावलेले दोन आजचा गुन्हा क्रमांक 172/2026 मध्ये आरेापी आहेत. या प्रकरणात अगोदर पोलीसांनी जयकुमार उर्फ सोनु कैलास राऊत (23) आणि शाकेर खान रशिद खान (30) या दोघांना अटक केली. या प्रकरणात आरोपींना पळून जाण्यात मदत करणारे दिग्विजय गणेशराव नारगुडे (22) आणि मन्मथ वसंतराव मंगरुळे (25) यांनाही अटक झाली होती. त्यानंतर शेख शाहरुख उर्फ कबुर शेख अजगर (29) आणि शेख उबेद शेख अजगर (23) या दोघांनाही अटक झाली आहे. यांची पोलीस कोठडी 25 एप्रिलपर्यंत आहे.
वाराणसी येथून आणलेले या प्रकरणातील आरोपी साईसिंह उर्फ साईलाला दिपकसिंह गहेरवार (26) आणि नितेश परमेश्र्वर इंगळे (22) या दोघांना आज पोलीस निरिक्षक महेश माळी आणि त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयात सरकारी वकील ऍड. शेख सादीक यांनी या प्रकरणाच्या तपासातील प्रगतीसाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. साईलाला आणि इंगळेच्यावतीने ऍड. जयकुमार ढवळे यांनी विरोध केला. दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी साईलाला आणि नितेश इंगळे या दोघांना चार दिवस अर्थात 28 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. पोलीसांनी न्यायालयात सादर केलेल्या अभिलेखाप्रमाणे इलियास उर्फ काला इल्लू आणि साईलाला गॅंगमधील इतर साथीदार फरार असल्याचे लिहिले आहे.
संबंधीत व्हिडीओ….
