संजय गायकवाड यांची अखेर दिलगिरी:'शिवाजी कोण होता' वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न; शिवरायांच्या एकेरी उल्लेखावर इशाराही दिला

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-24t16_1777028897.png




सत्ताधारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या वादात दिलगिरी व्यक्त करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत प्रकरणात माझ्याकडून काही अयोग्य शब्द वापरले गेले. या प्रकरणी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो, असे ते म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख मी कदापि सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शिर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. त्यात आमदार गायकवाड हे आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना ऐकू येत आहेत. या प्रकरणी गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठली असताना त्यांनी शुक्रवारी दिलगिरी व्यक्त करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. काय म्हणाले संजय गायकवाड? संजय गायकवाड म्हणाले, छत्रपती शिवरायांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वक “छत्रपती शिवाजी महाराज” असाच व्हावा, ही माझी ठाम भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा कोणताही एकेरी किंवा अवमानकारक उल्लेख मी कदापि सहन करणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. संबंधित पुस्तकातील एकेरी उल्लेखांवर मी आक्षेप नोंदवला असून, हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराचा आहे, असे माझे मत आहे. अलीकडील वादात माझ्याकडून वापरले गेलेले काही शब्द अयोग्य होते, याची मला जाणीव आहे आणि त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मला खेद आहे. छत्रपती शिवरायांविषयी निष्ठा आणि सन्मान कायम ठेवत, संबंधितांनी योग्य दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा गोष्टी टाळाव्यात, ही माझी अपेक्षा आहे. छञपती शिवाजी महाराज की जय. एक कट्टर शिवभक्त, असे गायकवाड यांनी आपल्या दिलगिरीत म्हटले आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed