राहुल गांधींचे नेतृत्व वारसाहक्काने नव्हे, संघर्षातून उभे राहिले:काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचे प्रतिपादन




काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नेतृत्व केवळ वारसाहक्काने नव्हे, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील संघर्ष आणि त्यागातून उभे राहिले आहे. म्हणूनच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या जागा दुप्पट करून राहुल गांधींच्या नेतृत्वाला भक्कम पाठिंबा दिला, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे मुख्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले. राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि ‘एनएसयूआय’चे आजी-माजी पदाधिकारी ऋत्विक धनवट, अक्षय कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. राहुल गांधींच्या जीवनप्रवासातील विविध पैलू आणि जनसामान्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे दर्शन या प्रदर्शनातून घडवण्यात आले. पुण्याच्या ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन’ येथे आयोजित या प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी तिवारी बोलत होते. या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, मोहन जोशी, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि दीप्ती चवधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. समारोप प्रसंगी तिवारी यांनी पुढे सांगितले की, गांधी-नेहरू कुटुंबाने नेहमीच देशाच्या उभारणीला आणि लोकशाहीला मजबूत करण्याला प्राधान्य दिले आहे. संकुचित स्वार्थाऐवजी व्यापक राष्ट्रहित जोपासण्याचा ‘डीएनए’ राहुल गांधींमध्ये आहे. म्हणूनच त्यांनी ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता देशात तब्बल १२ हजार किलोमीटरची ऐतिहासिक पदयात्रा पूर्ण केली. गेल्या १२ वर्षांत सत्ताधाऱ्यांनी नेहरू-गांधी कुटुंबावर केवळ चिखलफेक केली, परंतु ते एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याकडून आलेला निःस्वार्थी राष्ट्रसेवा आणि निर्दोष राष्ट्रभक्तीचा वारसा राहुल गांधींनी आपल्या कार्यातून सिद्ध केला आहे, असा विश्वास तिवारी यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सिद्धार्थ जांभूळकर, साहेबराव क्षीरसागर, ॲड. श्रीकांत पाटील, लक्ष्मीकांत हुंडेकर, राजेश सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *