पत्रकार हेमंत निखाडे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार:कृषी पत्रकारितेतील योगदानाबद्दल शासनाकडून सन्मान




अमरावती: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शुक्रवारी विविध पुरस्कार जाहीर केले. यामध्ये तिवसा तालुक्यातील पत्रकार हेमंत निखाडे यांना पत्रकारिता गटातून प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लवकरच मुंबई येथे एका विशेष समारंभात निखाडे यांना त्यांच्या पत्नीसह हा पुरस्कार प्रदान केला जाईल. हेमंत निखाडे गेल्या २१ वर्षांपासून तिवसा तालुक्यात कृषी पत्रकारिता करत आहेत. कृषी क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत प्रशासनाने त्यांना या पुरस्कारासाठी निवडले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी, प्रेरणादायी यशकथा आणि नाविन्यपूर्ण शेतीच्या पद्धतींवर आधारित सकारात्मक वृत्तांकन केले आहे. शेतीच्या बांधावर जाऊन त्यांनी अनेक महत्त्वाच्या स्टोरीज प्रसिद्ध केल्या आहेत. यापूर्वीही निखाडे यांना अनेक शासकीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये राज्य शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्ती पत्रकारिता पुरस्कार, जलयुक्त शिवार योजनेतील जलमित्र पुरस्कार आणि राजीव गांधी विदर्भस्तरीय कृषिरत्न पुरस्काराचा समावेश आहे. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *