ऑपरेशन टायगर संकटात:ओमराजे म्हणाले – शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अजून नाही, मतदारसंघात जावून चर्चा करून पुढचे ठरवणार!




‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,’ अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर संकटात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. ‘भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या विचार केल्यास तो बरोबर आहे,’ असे समर्थनही त्यांनी केले होते. मात्र, आज पवनराजे हत्याकांडाचा निकाल येताच, त्यांनी या भूमिकेवरून यू टर्न घेतल्याचे दिसते. दुर्दैवी आणि धक्कादायक निकाल तब्बल 20 वर्षांपू्र्वी झालेल्या पवनराजे हत्याकांड निर्णयाचा निकाल आज आला. या प्रकरणी सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, ‘आज लागलेला निकाल दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. तिथेही निकाल नाही मिळाला, तर पुढे सर्वोच्च न्यायालयात जावू.’ कलियुगात वाईटाला चांगले बळ ओमराजे म्हणाले की, ‘सध्या कलियुग आहे. कलियुगात वाईटाला चांगले बळ असते. चांगल्याला लवकर यश मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच न्यायालय आणि संविधानावर विश्वास ठेवूनच पुढे जावे लागेल,’ अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तपास यंत्रणा मॅनेज झाल्या होत्या ओमराजे पुढे म्हणाले की, ‘सुरुवातीच्या तपास यंत्रणा मॅनेज होत्या. त्यानंतर सीबीआयकडे तपास आला. तिथून तपास झाला. सध्या कलियुग आहे. कलियुगात वाईटाला चांगले बळ असते. चांगल्याला लवकर यश मिळत नाही,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. लोकांशी चर्चा करून निर्णय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली आहे. सहा खासदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर आहेत. आपल्या राजकीय भूमिकेवर ते म्हणाले की, ‘मी मतदार संघात जाईन. सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेईन. या केसचा आणि माझ्या निर्णयाचा काही संबंध नाही. गेली 20 वर्ष झाली. वडील, त्यांच्या चालकाची हत्या झाली होती. त्यामुळे हा निकाल माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता. आता मतदारसंघात जाईन. लोकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेईन.’ अचानक घेतला यू टर्न ‘भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या विचार केल्यास तो बरोबर आहे. समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही,’ अशा शब्दांत ओमराजे निंबाळकर यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे सुतोवाच दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीकडे केले होते. मात्र, आता पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतर त्यांनी ही भूमिका बदलल्याचे दिसते. दिव्य मराठीला ओमराजेंनी दिलेली मुलाखत जशीच्या तशी… समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही, अशा शब्दांत उद्धवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याबाबत आपली परखड भूमिका मांडली. उद्धवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओमराजे यांनी पहिलीच मुलाखत ‘दिव्य मराठी’ला दिली. ते म्हणाले, भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतो पण राजकीयदृष्ट्या विचार केल्यास तो बरोबर आहे. मी सध्या पुण्यात असून 20 जूनला वडिलांच्या (पवनराजे निंबाळकर) हत्येच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. दिव्य मराठी : शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चांवर तुमची नेमकी भूमिका काय? ओमराजे : मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. जर भावनिक विचार केला तर हे पाऊल चुकीचे वाटते. पण राजकीय विचार केला तर तेच बरोबर आहे. शिंदेसेनेतील प्रवेशावरून माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. मी सध्या पुण्यात आहे. २० जूनला माझ्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करेन आणि पुढील निर्णय घेईन. दिव्य मराठी : पक्षांतराच्या मागे काही आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे? ओमराजे : पैसे घेतल्याची चर्चा संपूर्णपणे खोटी आणि तथ्यहीन आहे. माझ्यासाठी सत्ता आणि पैसा नेहमीच गौण राहिले आहेत. हा निर्णय पैशांसाठी नाही, तर मतदारसंघातील विकासकामे आणि अपेक्षेने पाहणाऱ्या मतदारांसाठी आहे. दिव्य मराठी : महायुतीचे नेते आणि तुमच्या पक्षनेतृत्वाच्या कार्यपद्धतीत तुम्हाला काय फरक दिसतो? ओमराजे : खूप मोठा आणि स्पष्ट फरक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इतके आमदार निवडून आलेले असतानाही ते शांत बसलेले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही ते स्वतः फिरत आहेत. दुसरीकडे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्धव ठाकरे यांना फिरणे शक्य नाही हे मी समजू शकतो, पण किमान आदित्य ठाकरेंनी फिरायला हवे होते. कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे होती, पण दुर्दैवाने ते झाले नाही. दिव्य मराठी : भविष्यात उद्धवसेनेत काय अडचण दिसते? ओमराजे : खासदार म्हणून लोकांची कामे करण्यासाठी आपण इतके प्रयत्न करतो. तरीही नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपली सत्ता का येत नाही? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. हीच स्थिती राहिली, तर भविष्यात माझ्या राजकीय अस्तित्वालाही धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा वेळी लोकप्रतिनिधी म्हणून मी काय करावे? दिव्य मराठी : मतदारसंघात कामे करताना नक्की काय अडचणी आहेत? ओमराजे : लोकांना शेतरस्ते हवे आहेत, पूल हवे आहेत. गावात डीपी (रोहित्र) बसवण्यासाठी मी स्वतः तीन-तीन वेळा प्रस्ताव देऊनही कामे होत नाहीत. आमच्याकडे ना निधी असतो, ना काम करता येते. समोर सत्ता आणि पैसा आहे, माझ्याकडे पक्षाविषयी निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही. दिव्य मराठी : तुम्हाला पक्ष प्रवेशासाठी पैसे दिल्याची व वाय प्लस सुरक्षा पुरविल्याची चर्चा आहे? ओमराजे : तसे काहीही झालेले नाही. मी पैशासाठी राजकारणात आलेलो नाही. तसे असते तर यापूर्वीच पक्षप्रवेश केला असता. राहिला प्रश्न वाय प्लस सुरक्षेचा. कुठला खासदार फोनवर प्रत्येकाशी बोलतो. मी प्रत्येकासोबत फोनवर बोलत आहे. मला कुठल्याही सुरक्षेची गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *