माढा तालुक्यात द्राक्षबागांतील कामांना वेग:पावसाळा तोंडावर आल्याने रोगराई रोखण्यासाठी बागायतदार रात्रं- दिवस शिवारात‎




परिसरातील द्राक्षबागांमध्ये सध्या इराळणी, फवारणी, वेल बांधणी आणि बागेच्या निगेची कामे वेगाने सुरू असून द्राक्षबागायतदारांच्या कष्टाची खरी परीक्षा सुरू झाली आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बाग निरोगी ठेवण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. द्राक्षबागेतील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात योग्य व्यवस्थापन झाले तरच पुढील हंगामात दर्जेदार उत्पादन मिळण्याची शक्यता वाढते. माढा तालुक्यात एकूण ३२२ हेक्टर द्राक्षबाग क्षेत्र आहे. सध्या शेतकरी बागेतील अनावश्यक फुटवे काढणे, वेलींची वाढ नियंत्रित ठेवणे, आवश्यक खतांचा पुरवठा करणे आणि वेळेवर फवारणी करणे या कामांमध्ये व्यस्त आहेत. सध्या बागांमध्ये सर्वाधिक भर खुडाईच्या कामावर दिला जात असून प्रत्येक वेलीची बारकाईने निगा राखली जात आहे. पावसाळ्यात वाढणारी आर्द्रता द्राक्षबागांसाठी धोकादायक ठरू शकते. भुरी, डाऊनी मिल्ड्यू आणि इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने बागायतदारांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. त्यामुळे सध्या अनेक बागांमध्ये फवारण्यांची लगबग सुरू असून हवामानातील बदलांवर शेतकरी सतत लक्ष ठेवून आहेत. द्राक्ष उत्पादन हा परिसरातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा प्रमुख आधार असल्याने प्रत्येक हंगामाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते. मागील काही वर्षांत हवामानातील अनिश्चिततेमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी शेतकरी नव्या उमेदीने आगामी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. बागेतील प्रत्येक वेल निरोगी राहावी आणि उत्पादन चांगले मिळावे यासाठी शेतकरी कुटुंबासह राबत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. आताची मेहनत, नियोजन आणि योग्य व्यवस्थापन यावरच पुढील हंगामातील उत्पादनाचे गणित अवलंबून असल्याने द्राक्षबागांमध्ये सध्या खरी झुंज सुरू झाली आहे. ^द्राक्षबाग म्हणजे वर्षभराची जबाबदारी. घड निघेपर्यंत शेतकऱ्याला स्वस्थ बसता येत नाही. सध्या खुडाई, फवारणी, खत व्यवस्थापन आणि पाण्याचे नियोजन ही कामे वेळेत करावी लागतात. पावसाळा जवळ आल्याने एक दिवसाचा हलगर्जीपणाही महागात पडू शकतो. आज बाग जपली तरच उद्या बाग शेतकऱ्याला जपते. — सचिन राऊत, द्राक्ष बागायतदार, मानेगाव बाग जपली तर उद्या बाग शेतकऱ्याला जपते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *