शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज:प्रकृती पूर्णपणे ठणठणीत, डॉक्टरांचा पूर्ण विश्रांती घेण्याचा अन् प्रवास टाळण्याचा सल्ला

0
db-temp-cover-marathi-2026-04-23t182415344_1776948883.jpg




राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून, नियमित वैद्यकीय तपासणीनंतर ते आता आपल्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. सोमवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. शरद पवार यांना सोमवारी सकाळी प्रकृती अस्वास्थेमुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात नेण्यात आले होते. ही तपासणी पूर्णपणे ‘रुटीन चेकअप’चा भाग होती. डॉक्टरांनी त्यांच्या सर्व आवश्यक चाचण्या केल्या असून त्याचे अहवाल सकारात्मक आले आहेत. तथापि, वाढते वय आणि सततचे दौरे यामुळे येणारा थकवा लक्षात घेता, डॉक्टरांनी त्यांना काही काळ सक्तीची विश्रांती घेण्याचा आणि प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस ‘सिल्व्हर ओक’वरच मुक्काम शरद पवार साहेबांची तब्येत उत्तम असून ब्रिज कँडी मधून त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या सिल्वर ओक येथे ते विश्रांती घेत आहेत, अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिली. शरद पवारांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच डिस्चार्ज झाल्याचा आनंदही व्यक्त केला आहे. बारामती पोटनिवडणुकीत मतदानापासून वंचित दरम्यान, आज बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदार पार पडले. १९६७ मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत कधीही आपला मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या शरद पवार यांना यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानापासून दूर राहावे लागले. ही माहिती स्वतः शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे दिली होती. या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, असे शरद पवार म्हणाले होते. तसेच त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed