उद्धव ठाकरेंनीच विधानपरिषदेची निवडणूक लढवावी:खासदार सुप्रिया सुळेंचे आग्रही ट्विट; हर्षवर्धन सपकाळांनीही घेतली 'मातोश्री'वर भेट
![]()
राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीतून काँग्रेसने आधीच अनुकूलता दर्शवली असताना, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंनीच पुन्हा निवडणूक लढवावी, अशी विनंती केल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्याच नावाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी उद्धव ठाकरे यांनीच पुन्हा निवडणूक लढवावी यासाठी आग्रह धरला असून, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘मातोश्री’वर जाऊन तर विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियाद्वारे ही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विटद्वारे ठाकरेंना निवडणूक लढवण्याची विनंती केल्याने, संपूर्ण आघाडीचा त्यांनाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत असून आता उद्धव ठाकरे स्वतः काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उद्धवजींनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा- सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले की, महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. उद्धवजींनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती, असे म्हटले आहे. उद्धवजी ठाकरे लढणार असतील तर त्याचे स्वागत- विजय वडेट्टीवार कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटले की, महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे लढणार असतील तर त्याचे स्वागत असेल. पण ते जर निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल. कारण त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या जागी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल याबाबत ही आताच स्पष्टता करावी लागेल. महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी तिन्ही पक्षाच्या समन्वयाने निर्णय घ्यावे लागतील. मीडियाच्या माध्यमातून याबाबत चर्चा घडवून आणणे उचित नाही, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
